

नवी दिल्ली : पृथ्वी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेची निर्मिती करणाऱ्या एकाच वायू आणि धुळीच्या ढगातून निर्माण झाले आहेत. मात्र, असे असतानाही या शेजारील ग्रहांच्या निर्मितीचा आणि उत्क्रांतीचा प्रवास पूर्णपणे वेगळा राहिला आहे, असे कोपेनहेगन विद्यापीठाच्या ‘ग्लोब इन्स्टिट्यूट’च्या संशोधकांनी केलेल्या नवीन अभ्यासात समोर आले आहे ‘नेचर अॅस्ट्रोनॉमी’मध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.
निर्मिती प्रक्रियेतील मुख्य फरक
संशोधनानुसार, हे ग्रह दोन प्रमुख ग्रहांच्या वाढीच्या प्रक्रियेतील वेगवेगळ्या प्रमाणातून तयार झाले आहेत. पृथ्वीच्या वस्तुमानापैकी कमीत कमी ७५ टक्के भाग हा दोन तरुण ग्रहांच्या शरीरातून (प्रोटोप्लॅनेट) आला आहे, ज्यांनी स्वतः लहान कणांना (पेबेल्स) गोळा करून वाढ केली होती. यामध्ये किलोमीटर आकाराचे खडक किंवा ‘प्लॅनेटिसिमल्स’ यांचा वाटा उर्वरित २५ टक्केपर्यंत असू शकतो.
मंगळाची निर्मिती : मंगळाचा मार्ग यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. मंगळाचे जवळपास ७५ टक्के वस्तुमान हे ‘प्लॅनेटिसिमल्स’च्या एकत्रिकीकरणामुळे बनले, तर सुमारे २५ टक्के भाग लहान कणांच्या अॅक्रेशनमुळे (गुरुत्वाकर्षणामुळे आजूबाजूचे पदार्थ किंवा वायू एकत्र येऊन खगोलीय वस्तू (जसे की तारा किंवा ग्रह) तयार होण्याची प्रक्रिया.) मिळाली.
रासायनिक खुणा आणि संगणकीय मॉडेलचा आधार
ग्रहांच्या या सुरुवातीच्या इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी संशोधकांनी त्यांच्या भूमीतील रासायनिक खुणांचा अभ्यास केला. यामध्ये सोडियम, झिंक आणि पोटॅशियम यांसारख्या बाष्पीभवन होणाऱ्या घटकांवर विशेष लक्ष केंद्रित केले, जे उच्च तापमानावर उडून जाऊ शकतात. त्यांच्या उपस्थितीवरून ग्रहांच्या निर्मितीच्या परिस्थितीचा अंदाज आला. संशोधकांनी संगणकीय मॉडेलचा वापर करून वेगवेगळ्या निर्मितीच्या परिस्थितींची तुलना केली. यावरून असे दिसून आले की, दोन्ही ग्रहांच्या निर्मितीत प्लॅनेटिसिमल्स आणि पेबल अॅक्रेशन या दोन्ही पद्धतींचा संकर ( हायब्रीड मॉेडेल) होता; परंतु पृथ्वी आणि मंगळासाठी त्यांचे प्रमाण वेगवेगळे होते.
ग्रहांच्या उत्क्रांतीतील फरक
निर्मितीच्या या भिन्न इतिहासामुळेच पृथ्वी आणि मंगळामध्ये नंतर मोठा फरक पडला. मंगळ हा पृथ्वीच्या तुलनेत आकाराने खूप लहान आहे, ज्यामुळे त्याचे आतील भाग अधिक जलदगतीने थंड झाले. हा नवीन अभ्यास खडकाळ ग्रहांच्या निर्मितीवर प्रकाश टाकण्यासोबतच काही ग्रहांवर जीवसृष्टी आणि पाणी टिकवून ठेवण्यासाठी अनुकूल वातावरण का तयार होते, याचे कोडे सोडवण्यास मदत करतो.