युरोप अंतराळात उभारणार डाटा सेंटर Pudhari File Photo
विश्वसंचार

डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी अंतराळात उभारणार

पुढारी वृत्तसेवा

ब्रसेल्स : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे डाटा सुरक्षित ठेवणे हे आव्हानात्मक ठरत चालले असून, या पार्श्वभूमीवर युरोप अंतराळात डिजिटल सेंटर उभारण्याची योजना आखत आहे. असेंड या युरोपीय कंपनीने यासाठी 2.1 लाख रुपये खर्च करत यावर अभ्यास पूर्ण केला. 16 महिन्यांच्या अथक अभ्यासानंतर याचे नियोजन केले गेले आहे.

युरोप अंतराळात उभारणार 13 डाटा सेंटर

सदर डिजिटल सेंटर सूर्य प्रकाशावर संचलित असणार आहे, असे याचे प्रोजेक्ट मॅनेजर डॅमियन डॅमेस्टीयर यांनी नमूद केले. पृथ्वीपासून 1400 किलोमीटरवर सदर डाटा सेंटर स्थापित केले जाणार आहे. हे अंतर इंटरनॅशनल स्पेस सेंटरपेक्षा तीन पटीने अधिक आहे. इंटरनॅशनल स्पेस सेंटर पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर आहे. असेंड कंपनी या उपक्रमांतर्गत 13 डाटा सेंटर उभारणार असून, 2036 पर्यंत त्यांची क्षमता 10 मेगावॅट इतकी असेल. सध्या जगभरात रोज 402.74 मिलियन टेराबाईट डाटा निर्मिती होते आणि भविष्यात हा सर्व डाटा सुरक्षित ठेवला जाणे अर्थातच आव्हानात्मक असणार आहे. अंतराळातील डाटा सेंटरमुळे पर्यावरण संरक्षणातही मोठी मदत होणार आहे. पृथ्वीवर डाटा संरक्षणासाठी आवश्यक असणारे सर्व्हर थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज व पाणी वापरले जाते. सध्याची एकंदर स्थिती पाहता, पाणी व ऊर्जा या दोन्ही बाबतीत संकटे आहेत. या पार्श्वभूमीवर पृथ्वीवरील डाटा सुरक्षा अर्थातच आणखी आव्हानात्मक होत जाणार आहे.

अंतराळातील डाटा सेंटर सौर ऊर्जेवर अवलंबून

आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीवरील डाटा सेंटरवर 2026 पर्यंत प्रत्येक तासाला 1 हजार टेरावॅट वीज लागेल. यामुळे पृथ्वीवरील उत्सर्जनही त्या प्रमाणात वाढत राहील. या पार्श्वभूमीवर अंतराळातील डाटा सेंटर सौर ऊर्जेवर अवलंबून असल्याने, पृथ्वीवरील उत्सर्जनाचे नेट झीरोचे लक्ष्य सहज साध्य करता येणे शक्य होऊ शकते. अगदी भारतातही सध्या रोज 1.45 ट्रिलियन मेगाबाईट डाटानिर्मिती होत आहे. 2028 पर्यंत येथे 3.6 गिगावॅट क्षमतेच्या डाटा सेंटरची येथे गरज असणार आहे. सध्या भारतात 2.32 गिगावॅट क्षमतेचे डाटा सेंटर निर्मिले जात आहे. एका आकडेवारीनुसार, सध्या प्रत्येक भारतीय दर महिना सरासरी 19 जीबी डाटाचा उपयोग करत आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद व चेन्नई डाटा सेंटरचे हब आहेत. 90 टक्के डाटा सेंटर येथूनच आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT