PM Modi Rahul Gandhi conversation
नवी दिल्ली: संसद परिसरात महात्मा जोतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात शनिवारी एक संक्षिप्त आणि मनमोकळी चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गाडीतून खाली उतरले आणि राहुल गांधी यांच्याशी त्यांनी काही क्षण थांबून संवाद साधला. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली समजू शकले नाही, पण दोन्ही नेते एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहून बोलत होते. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त 'प्रेरणा स्थळ' येथे आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी प्रेरणा स्थळ येथे समाजसुधारक जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी या दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने तीव्र शाब्दिक युद्ध सुरू असते. गेल्या काही दिवसांत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली होती, तर पंतप्रधानांनीही निवडणूक काळात राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर, आज दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी साधलेला संवाद सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
सातारा जिल्ह्यात १८२७ मध्ये जन्मलेल्या महात्मा जोतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या साथीनं स्त्री शिक्षण आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जातीभेद निर्मूलनाचे ऐतिहासिक कार्य केले. आज त्यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त देशभरात त्यांना अभिवादन करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनीही 'एक्स' वरून महात्मा फुलेंच्या कार्याबद्दल गौरवोग्गार काढले.
"सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील महात्मा फुलेंचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून वंचितांना सक्षम केले," अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली.
"महात्मा फुलेंनी आपले संपूर्ण आयुष्य वंचितांच्या हक्कांसाठी समर्पित केले. भेदभाव आणि असमानतेविरुद्धचा त्यांचा लढा आजही देशाला सामाजिक न्यायाची वाट दाखवत आहे," असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.