Mahatma Jyotirao Phule | भारताच्या भविष्याचे मार्गदर्शक

Mahatma Jyotiba Phule
महात्मा जोतिबा फुले
Published on
Updated on

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आज 11 एप्रिल. भारताचे महान समाजसुधारक एक आणि पिढ्यान् पिढ्यांचे दीपस्तंभ महात्मा जोतिराव फुले यांची आज जयंती. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या उत्सवाचा प्रारंभ आजपासून होत आहे. त्यानिमित्त...

महात्मा फुले हे एक महान समाजसुधारक होते. त्याबरोबरच त्यांचे जीवन नैतिक धैर्य, निरंतर जिज्ञासा आणि सामाजिक हितासाठी अविचल वचनबद्धतेचे प्रतीक होते. महात्मा फुले यांनी उभारलेल्या संस्था आणि त्यांनी नेतृत्व केलेल्या चळवळींसाठी त्यांचे स्मरण केले जाते. 1827 मध्ये महाराष्ट्रात जन्मलेल्या महात्मा फुले यांची अत्यंत सामान्य परिस्थितीतून सुरुवातीची वाटचाल सुरू झाली; परंतु सुरुवातीच्या काळात आलेल्या या अडचणी त्यांचे शिक्षण, धैर्य किंवा समाजाप्रति असलेल्या बांधिलकीच्या आड कधीही आल्या नाहीत. शालेय जीवनापासूनच तरुण जोतिराव अत्यंत जिज्ञासू होते आणि त्यांच्यात वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली होती. अनेकदा ते त्यांच्या वयातील मुलांकडून अपेक्षित असलेल्या पुस्तकांपेक्षा कितीतरी पटीने अधिक पुस्तकांचे वाचन करत असत. अनेक वर्षांनंतर याविषयी बोलताना ते म्हणाले होते, ‘आपण जितके जास्त प्रश्न निर्माण करू, तितके ज्ञान त्यातून बाहेर येईल.’ त्यांच्या बालपणापासून त्यांना लाभलेली चौकस वृत्ती त्यांच्या वाटचालीत सदैव स्थिर राहिली.

महात्मा फुले यांच्या आयुष्याचे ध्येय हे शिकणे आणि शिक्षण देणे हेच बनले होते. शिक्षण आणि ज्ञान, ही कोणा एकाची मक्तेदारी असू शकत नाही, ती एक शक्ती आहे, जी सगळ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे, याची अत्यंत दुर्मीळ अशी स्पष्टता त्यांना आली होती. जेव्हा शिक्षणाचा आनंद अनेकांना नाकारला जात होता, अशा काळात त्यांनी मुलींसाठी आणि ज्यांना औपचारिक शिक्षणापासून वंचित ठेवले गेले होते, अशा सर्वांसाठी पहिल्यांदा शाळा सुरू केल्या. ते म्हणत, ‘मुलांमध्ये आईच्या मार्फत होणारी कोणतीही सुधारणा अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणूनच जर शाळा सुरू करायच्या असतील, तर त्या मुलींसाठी काढल्या पाहिजेत.’ त्यांनी अशा एका समाजाच्या निर्मितीसाठी काम केले, जिथे शाळा या न्याय आणि समता प्रस्थापित करण्याचे माध्यम बनल्या.

महात्मा फुले यांचे ज्ञान आणि शहाणीव यातून त्यांची कृषी, आरोग्य आणि ग्रामविकासाविषयीची समज विकसित झाली होती. आपले शेतकरी आणि कामगार यांच्यावर होणारा अन्याय आपल्या समाजाला दुर्बल करतो आहे, असे ते नेहमी म्हणत असत. गावात असो किंवा मग शेतात, या घटकांना सामाजिक विषमतेचे चटके कसे सहन करावे लागत आहेत, ते त्यांनी पाहिले होते आणि म्हणूनच त्यांनी गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांना त्यांचा आत्मसन्मान त्यांची प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. त्याच वेळी सामाजिक सौहार्दसुद्धा कायम राहील यासाठीदेखील त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.

महात्मा फुले म्हणाले होते की, जोपर्यंत समाजातील सर्वांना समान अधिकार मिळत नाहीत, तोपर्यंत खरे स्वातंत्र्य मिळत नाही. म्हणूनच तर त्यांनी हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरणार्‍या संस्था उभ्या केल्या आणि या संस्थांनी एका न्याय्य समाजाच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. त्यांनी स्थापित केलेला सत्यशोधक समाज ही चळवळ आधुनिक भारतातील सर्वात महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा चळवळींपैकी एक होती. सामाजिक सुधारणा, समाजसेवा आणि प्रत्येक माणसाच्या सन्मानाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात ही चळवळ आघाडीवर होती. ही चळवळ समाजातील महिला, युवा आणि ग्रामीण भागात राहणार्‍या लोकांची एक ठोस प्रभावशाली अभिव्यक्ती बनली. समाजाने आपल्या गाभ्याशी न्याय, प्रत्येक व्यक्तीबद्दलचा आदर आणि सामूहिक प्रगतीची भावना ही मूल्ये जपली, तर तो समाज अधिक सक्षम होऊ शकतो असा महात्मा फुले यांचा ठाम विश्वास होता. या चळवळीतूनही महात्मा फुले यांच्या याच विश्वासाचे प्रतिबिंब उमटले होते. महात्मा फुले यांच्या वैयक्तिक जीवनातूनही आपल्याला धैर्याची शिकवण मिळते. सतत कामात गुंतून राहिलेले असणे, सातत्याने लोकांमध्ये असणे याचा त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणामही झाला; मात्र प्रकृतीबात अत्यंत गंभीर आव्हाने समोर असतानाही त्यांचा निर्धार तसूभरही ढळला नाही. अर्धांगवायूच्या गंभीर झटक्याने त्यांना असंख्य मर्यादा आल्या; पण तरीही त्यांनी आपले काम आणि संकल्प साकारण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांचे शरीर जणू त्यांची सत्त्वपरीक्षाच घेत होते; मात्र समाजाप्रती असलेल्या वचनबद्धतेपासून त्यांनी कधीही फारकत घेतली नाही. त्यामुळेच आजही लाखो लोकांसाठी महात्मा फुले यांचा हा पैलू सर्वात शक्तिशाली पैलूंपैकी एक आहे.

सावित्रीबाई फुले यांचा आदरपूर्वक उल्लेख केल्याशिवाय महात्मा फुले यांचे स्मरण पूर्ण होऊच शकत नाही. त्या स्वतः देशातील महान सुधारकांपैकी एक होत्या. भारतातील स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया रचणार्‍या आघाडीच्या महिला शिक्षिकांपैकी त्या एक होत्या. त्यांनी मुलींच्या शिक्षणाला पुढे नेण्यात निर्णायक भूमिका बजावली होती आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मुलींना मिळवून दिली होती. महात्मा फुले यांचे निधन झाल्यानंतरही सावित्रीबाईंनी हा वसा तसाच पुढे चालू ठेवला. 1897 मध्ये प्लेगच्या साथ रोगाचा उद्रेक झालेला असताना त्यांनी बाधित रुग्णांची समर्पण भावनेने सेवा केली. त्या स्वतः त्या रोगाच्या विळख्यात सापडल्या आणि त्यातच त्यांना प्राण गमावावे लागले. देशात शेकडो वर्षांपासून समाज सुधारणेची कळकळीची हाक समाजातून उमटली आहे, ती अशा लोकांकडून ज्यांना समाजातील दुःख स्पष्टपणे दिसत होते आणि नशिबाचा भाग म्हणून तो स्वीकारायला त्यांनी ठामपणे नकार दिला. महात्मा जोतिराव फुले हे अशाच एका बुलंद आवाजाचे प्रतीक होते.

मला 2022 मधील माझ्या पुणे भेटीचे स्मरण होते. त्यावेळी मी शहरातील फुले यांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन केले होते. आपण त्यांच्या द्विशताब्दी वर्षात पाऊल ठेवत आहोत. अशावेळी या सगळ्याचे पुनर्नविनीकरण अर्थात नवी मांडणी करणे हीच महात्मा फुले यांना वाहिलेली यथार्थ आदरांजली ठरेल. त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या शिक्षणासारख्या विषयांप्रती आपल्या बांधिलकीची नव्याने मांडणी करत आहोत, अन्यायाप्रती आपल्या संवेदनशीलतेची पुन्हा नव्याने जाणीव करून देत आहोत आणि समाजात स्वबळावर स्वतःत सुधारणा घडवून आणण्याची क्षमता आहे, हा विश्वास नव्याने जागृत करत आहोत. नैतिक स्पष्टता आणि लोककल्याणाचा उद्देश यांची जोड मिळाल्यास भारतातील सामुदायिक शक्ती चमत्कार घडवून आणू शकते, असेच त्यांची जीवनगाथा आपल्याला सांगते आणि म्हणूनच ते आजही लाखोंना प्रेरणा देत आहेत. त्यांचे शब्द आणि कृती यांच्यातून आजही आशेचा किरण डोकावतो आणि म्हणूनच महात्मा जोतिराव फुले हे त्यांच्या जन्मापासून दोनशे वर्षांनंतरही केवळ भूतकाळातील एक व्यक्तिमत्त्व नव्हे, तर भारताच्या भविष्याचे मार्गदर्शक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news