मुंबई : आगामी नगरपरिषद, नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद निवडणुकांबाबत काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांसाठी काँग्रेसने राज ठाकरेंच्या मनसे आणि ओवैसी यांच्या एमआयएम पक्षासोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची जिल्हाजिल्ह्यात बैठकीचं सत्र सुरू आहे. यात महाविकास आघाडीबाबतही चर्चा झाली. महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर वंचित आणि मित्र पक्षांसोबत आघाडी करण्यास काँग्रेसची तयारी आहे. मात्र, एमआयएमसोबत युती करणार नसल्याचं काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया आहे.
निवडणुकांबाबत सर्व जिल्ह्यांच्या बैठक संपल्या असून काही पातळीवर सर्व प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. तिकीट वाटपाची प्रक्रिया ही प्रदेश पातळीवरून पूर्ण होणार असून दोन- तीन दिवसात चित्र स्पष्ट होईल. मनसेसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव अद्याप कोणत्याही जिल्ह्यातून आलेला नाही.हर्षवर्धन सपकाळ
मनसेसोबतचा युतीचा निर्णय हायकमांड घेणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याचा निर्णय हायकमांड घेतील असंही सूत्रांकडून समजते. महापालिका निवडणुका या जानेवारीत होणार असून महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतरच मनसेसोबतच्या युतीचा निर्णय घेतला जाईल, असंही सूत्रांकडून समजते.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राजकारणात भूकंप?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत मोठा स्फोट होणार अजून काही प्रवेश होतील असं सूचक विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केल्यानं नेमकं कोण काँग्रेसमध्ये जाणार याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे.