

Thane Municipal Election 2017 Results In Marathi
ठाणे : दिलीप शिंदे
ठाणे महापालिकेवर सलग ३० वर्ष शिवसेनेचा भगवा फडकत आलेला आहे. १९८७ ते १९९३ या काळातील काँग्रेसची सत्ता वगळता ठाणे महापालिकेच्या स्थापनेपासून भाजपला उपमहापौरपद देऊन शिवसेनेने आपला महापौर बसविलेला आहे.
गेल्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे एकमेकांविरोधात लढले होते. त्यावेळी शिवसेनेने ६७ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३४ जागा जिंकल्या तर २३ नगरसेवकांमुळे भाजप तिसऱ्या स्थानावर फेकली गेली होती.
आता पुन्हा शिवसेनेच्या उभ्या फुटीमुळे भाजपचा स्वबळाचा नारा यशस्वी होतो की महायुतीत निवडणुका लढविल्या जातात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस तीन, एमआयएम दोन, अपक्ष दोन असे नगरसेवक निवडून आले होते. मनसेला खाता उघडता आला नव्हता.
ठाणे महापालिकेची २०१७ मध्ये झालेली निवडणूक ही अटीतटीची मानली जात होती. राज्यात भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तर एकनाथ शिंदे हे मंत्री होते. आता ही तशीच परिस्थिती आहे. त्याअनुषंगाने गेल्या निवडणुकीचा निकाल हा इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरू शकते. शिवसेनेचे संजय पांडे हे अवघ्या १३ मतांच्या फरकांनी जिंकले होते. तर शिवसेनेचे योगेश जानकर यांनी सर्वाधिक १० हजार २०६ मतांच्या फरकाने विक्रमी विजय मिळविला होता. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा धुव्वा उडविला होता.