पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला आयपीएलच्या (Women's IPL media rights) मीडिया राइट्समध्ये वायकॉम १८ मीडिया प्रा. लि. ने (Viacom18 Media Pvt Ltd) बाजी मारली आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत दिली आहे. "Viacom ने ९५१ कोटी रुपयांना प्रक्षेपण हक्क (मीडिया राइट्स) मिळवले आहेत. म्हणजेच पुढील ५ वर्षांसाठी (२०२३-२७) प्रति सामना मूल्य ७.०९ कोटी रुपये इतके आहे. महिला क्रिकेटसाठी हे खूप मोठे आहे," असे जय शहा यांनी म्हटले आहे. महिला आयपीएलचे प्रक्षेपण हक्क मिळवल्याबद्दल शहा यांनी Viacom18 चे अभिनंदन केले आहे.
खेळाडूंच्या समान वेतन धोरणानंतर महिला आयपीएलसाठी प्रक्षेपण हक्कांसाठी लागलेली आजची बोली ही आणखी एक ऐतिहासिक आदेश आहे. भारतातील महिला क्रिकेटच्या सक्षमीकरणासाठी हे एक मोठे आणि निर्णायक पाऊल आहे, जे सर्व वयोगटातील महिलांचा सहभाग सुनिश्चित करेल. खरंच ही एक नवी पहाट आहे, असे जय शहा यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले आहे.
प्रक्षेपण हक्क मिळवण्याच्या बोलीत वायकॉमने डिस्ने स्टार, सोनी आणि Zee ला मागे टाकले. नेटवर्क १८ मालकीच्या असलेल्या मीडिया हाऊसकडे पुरुषांच्या IPL आणि दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या SA20 लीगचे डिजिटल अधिकार देखील आहेत.
बीसीसीआय मार्च २०२३ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर महिला क्रिकेटपटूंसाठी महत्त्वाकांक्षी फ्रँचायझी आधारित महिला आयपीएल स्पर्धा खेळवण्याची शक्यता आहे. BCCI ने डिसेंबर २०२२ मध्ये विविध प्रसारमाध्यमांना बोली लावण्यासाठी निविदा जारी केल्या होत्या.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मार्च २०२३ मध्ये बहुप्रतीक्षित महिला इंडियन प्रीमियर लीग (Women's IPL) स्पर्धेचे आयोजन करण्याची तयारी केली आहे. महिलांच्या आयपीएलमध्ये पाच संघ असतील. दक्षिण आफ्रिकेतील महिला T20 विश्वचषक स्पर्धा २६ फेब्रुवारी रोजी संपल्यानंतर लगेचच BCCI मार्च २०२३ साठी पाच संघांमध्ये आयपीएल स्पर्धा खेळवण्याची शक्यता आहे.
एका वृत्तानुसार, बीसीसीआयने राज्य संघटनांना पाठवलेल्या नोटनुसार महिला आयपीएलमध्ये २० लीग सामने खेळले जातील आणि संघ दोनवेळा एकमेकांशी लढतील. गुणतालिकेतील टॉपर्स थेट फायनलमध्ये प्रवेश करतील, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ एलिमिनेटर राउंडमध्ये लढतील. प्रत्येक संघात १८ खेळाडू असतील. त्यात परदेशातील जास्तीत जास्त सहा खेळाडूंचा समावेश असणार आहे. (Women's IPL media rights)
हे ही वाचा :