पुढारी ऑनलाईन: टेक्सासमधील साउथफोर्क डेअरी फार्म मध्ये मंगळवारी (दि.११) आग लागून मोठी दुर्घटना घडली. पश्चिम टेक्सास डेअरीमध्ये अचानक स्फोट झाल्याने ही आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत १८ हजारांहून अधिक गाईंचा मृत्यू झाला. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी आणि भयंकर दुर्घटना असल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या दुर्घटनेत डेअरी फार्ममधील एक कामगार जखमी झाला असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर कोणतीही मानवी जीवितहानी झालेली नाही. डेअरी फार्ममध्ये स्फोट कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मात्र, येथील काऊंटी न्यायाधीश मॅंडी गेफलर यांनी कोणत्या तरी इलेक्ट्रॉनिक उपकरणामुळे स्फोट झाला असावा, अशी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, टेक्सास अग्निशमन अधिकारी दुर्घटनेचा तपास करत आहेत.