

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयचे तत्कालीन तपासी अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी गुरुवारी (दि. 13) घेण्यात आली. तपासादरम्यान पुणे पोलिसांकडून काय-काय कागदपत्रे मिळाली व त्याआधारे काय चौकशी केली याची माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
या प्रकरणात 'सनातन' संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील, सीबीआयचे तत्कालीन तपासी अधिकारी एस. आर. सिंग यांची साक्ष पूर्ण झाली असून त्यांची उलटतपासणी बचाव पक्षातर्फे अॅड. प्रकाश साळशिंगीकर यांनी नोंदवली. या प्रकरणाचा पुणे पोलिसांनी ठिक-ठिकाणचा तपास करून गोळा केलेला डाटा तुम्ही तपासला का?, आरटीओ कार्यालयाकडून गाड्यांबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्ही त्या परिसरात कोणाचे मोबाईल लोकेशन होते, याची तपासणी केली का? असे प्रश्न विचारले असता त्यांनी 'नाही' असे सांगितल्याची माहिती अॅड. साळशिंगीकर यांनी दिली.