Latest

Russia Ukraine War : रशियाकडून शस्त्र खरेदी; भारतावर अमेरिकेचा रोष

अमृता चौगुले

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन ( Russia Ukraine War ) यांच्यातील युद्ध नवव्या दिवशीही सुरू असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना जगभरातून विरोध होत आहे. अनेक देशांनी रशियावर विविध निर्बंध लागू केले आहेत. भारताने थेटपणे युद्धाविरोधात भूमिका घेतलेली नाही. तथापि, अमेरिका आणि यूरोपने मात्र युद्धाला थेट विरोध दर्शविला आहे. तसेच विविध निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या निर्बंधांचा फटका भारतावरही पडणार आहे. रशियाकडून शस्त्र खरेदी करणार्‍या देशांना अमेरिकेच्या रोषास सामोरे जावे लागू शकते. साहजिकच याचा गंभीर परिणाम भारतावरही होणार आहे.

एका माहितीनुसार अमेरिकेतील बायडेन प्रशासन भारतावर रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदीवर निर्बंध लादण्याचा विचार करत आहे. अमेरिकेचे दक्षिण आशियाई प्रकरणांचे सहायक स्टेट सेक्रेटरी डोनाल्ड लू यांनी म्हटले आहे की, आमची इच्छा आहे की, जे तंत्रज्ञान आम्ही भारतासोबत शेअर करत आहोत, त्याचा फायदा रशियाला होता कामा नये. कारण भारत आणि रशियाचे संबंध चांगले आहेत. अमेरिकेने सातत्याने युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याबाबत ( Russia Ukraine War ) भारताला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर तरी भारताची भूमिका बदलणार आहे का?

रशियाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक निर्णयांना पाठिंबा दर्शवला आहे. नुकतेच रशियाने काश्मीर प्रश्नाबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचेही समर्थन केले होते. त्यामुळेच मोदी खुलेपणाने रशियाचा विरोध करत नाहीत.

सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका ( Russia Ukraine War )

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत या युद्धाच्या निषेध प्रस्तावावर मतदान झाले. त्यावेळी भारत त्यात गैरहजर राहिला होता. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले होते की, आम्हाला सावधपणे निर्णय घ्यायचा आहे. आम्ही या निषेध प्रस्तावाचा विचार करू आणि स्वतःच्या सर्वोत्तम हितानुसार निर्णय घेऊ.

भारत-अमेरिका संबंध ( Russia Ukraine War )

रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताच्या भूमिकेला अमेरिका वेगळ्या पद्धतीने पाहील, असा विश्वास भारताला आहे. कारण चीन विरोधात भारत आणि अमेरिका सोबत आहेत. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे क्वॉड या गटाचाही भाग आहेत. चीनचा प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने क्वॉडची स्थापना झाली आहे.

भारताचे नुकसान

सध्या भारतीय सैनिकांना गरज असलेली 65 टक्के शस्त्रास्त्रे भारत रशियातून आयात करतो. तसेच या शस्त्रास्त्रांच्या विविध पार्टस्साठीही भारत पूर्णतः रशियावर अवलंबून आहे. जर भारताच्या शस्त्र खरेदीवर निर्बंध लावले गेले तर भारताचे नुकसान होऊ शकते. कारण गलवानमध्ये भारत-चीन यांच्यात झालेल्या संघर्षानंतर भारताला चीनशी लढताना रशियाच्या शस्त्रास्त्रांची आणि रणनैतिक पाठिंब्याची गरज असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT