पुढारी ऑनलाईन डेस्क : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागांत अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. गेल्या २४ तासांत कोकणासह सातारा आणि पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. यामुळे आंबा, काजू मोहोरावर परिणाम झाला असून, याच्या उत्पन्नाला देखील मोठा फटका बसू शकतो, अशी माहिती आयएमडी पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ. के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. (Unseasonal Rain)
दरम्यान आज (दि.९) देखील धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची अधिक शक्यता असून, राज्यातील अन्य जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पावसाची शक्यता आहे. दरम्यान, विजांच्या कडकडाटांसह, ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील माहिती डॉ. होसाळीकर यांनी X अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्विट) शेअर केली आहे. (Unseasonal Rain)
सिंधुदुर्गात पुन्हा एकदा हवामान बदलले असून मळभ वातावरणामुळे थंडी पळाली आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी तर पाऊस दाटून आला होता. कणकवली, वैभववाडीसह जिल्ह्याच्या अनेक भागात सायंकाळच्या सत्रात अवकाळी पावसाच्या काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ऐन थंडीच्या मोसमात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू मोहोरावर परिणाम होणार आहे. आधीच मोहोर लांबला असताना या पावसाचा परिणाम दोन्ही पिकांच्या हंगामावर होणार आहे. या बदलत्या वातावरणामुळे आंबा, काजू आणि इतर पिकांच्या फलोत्पादनावर परिणाम होणार आहे. चांगली थंडी पडली तर आंबा, काजूचे उत्पादन चांगले होते. मात्र मोहोर येण्याच्या सुरूवातीपासूनच सातत्याने वातावरण बदलत असल्याने त्याचा फटका या दोन्ही पिकांना बसला आहे.
उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवाताचा परिणाम राज्यावर दिसत असून सोमवारी व मंगळवारी उत्तर आणि मध्य महाराष्ट्राला जोरदार ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवातामुळे किमान तापमान 4 ते 8 अंशांवर आले आहे. आगामी तीन दिवस पंजाब, हरियाणा आणि राजस्थानात थंडीची लाट अतितीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसत आहे. त्यातही प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात 8 व 9 जानेवारी रोजी मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागात प्रामुख्याने सोमवार व मंगळवारी मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.