

वॉशिंग्टन : क्रोटेलेरिया कनिंघमी हे असे आगळेवेगळे रोपटे आहे, ज्याची फुले हुबेहूब अगदी पक्ष्यांसारखी भासतात. या रोपट्याला ग्रीन बर्डफ्लॉवर, बर्डफ्लॉवर रॅटुल्पो, पॅरट पी, रीगल बर्डफ्लॉवर या नावाने देखील ओळखले जाते. या रोपट्याची फुले अनोखी मानली जातात. याचे कारण असे की, या फुलांपासून तयार केला जाणारा रस विशेष गुणकारी मानला जातो. हे रोपटे वेगाने वाढते, हे देखील त्याचे आणखी एक वैशिष्ट्य. एक्स या पूर्वाश्रमीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या रोपट्याचे एक छायाचित्र सध्या बरेच व्हायरल होते आहे.
क्रोटेलेरिया कनिंघमी हे ऑस्ट्रेलियन बारमाही रोपटे वैशिष्ट्यपूर्ण फुलांमुळे विशेष चर्चेत आले आहे. ही पोस्ट केली जाताच तासाभराच्या कालावधीत त्याला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. हे रोपटे अगदी 9 फुटांपर्यंत वाढू शकते. त्याची पाने भरीव असतात आणि त्याच्या फुलांनी तर सर्वांचेच लक्ष वेधून घेण्यात काहीच कसर सोडलेली नाही.
या रोपट्याचे नाव वनस्पती शास्त्रज्ञ एलन कनिंघम यांच्या नावावरून घेण्यात आले आहे. या रोपट्याची फुले अतिशय आकर्षक असल्याने त्यांचा सजावटीसाठी विशेष उपयोग केला जातो. 1816 ते 1839 दरम्यान या रोपट्याविषयी एलन यांनी सर्वप्रथम माहिती दिली होती. आदिवासी लोक या रोपट्याचा डोळ्यांच्या इलाजासाठी उपयोग करत असत. त्यामुळे, त्याचे औषधी गुण देखील नावारूपास आले आहेत.