महाड; पुढारी वृत्तसेवा महाड शहरातील शिमगोत्सव आगळा-वेगळा भासतो. गवळआळी मधील देव दानव युद्धाची परंपरा तंत्रज्ञानाच्या युगात आजही टिकून आहे. शिमग्याची आतुरता समस्त महाडवासीयांना लागून राहिलेली असते. त्यात विशेष करून गवळ आळी मधील जळकी लाकडं फेकण्याची व बोंब मारण्याची आजही ही प्रथा जशीच्या तशी तरुणांनानी टिकवून ठेवली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गावा-गावात शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शिमगोत्सव निमित्त करण्यात आले होते. ग्रामदैवत जाकमाताचा होम लागल्यानंतर शहरातील सर्व होम लावण्यात आले. गावरान खालुबाजा पिपेरीच्या स्वराला नगाराचा आवाज व होळीच्या गाण्यांनी सर्वत्र वातावरण मंत्रमुग्ध करणारे ठरले.
त्यात अनेक वर्षाची परंपरा असलेल्या शहरातील गवळआळी मधील उत्सव हा वेगळाच. पूजा केल्यानंतर होम लावल्यानंतर जळकी लाकडं एक मेकांच्या अंगावर फेकण्याची परंपरा यालाच देव दानवाचे युद्ध असे म्हटले जाते. होमच्या दोन्ही बाजूला दोन्ही बाजू कडील रहिवासी एकत्र येतात आणि हातातील पेटत लाकूड समोरील रहिवाशांच्या अंगावर फेकतात. शेकडो पेटती लाकडं एक मेकांच्या अंगावर फेकली जातात. या युद्धात कोणालाही भाजत नाही. अथवा कोणीही जखमी होत नाही हे विशेष आहे. हा खेळ पहाण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात.
महाड शहरातील गवळ आळी येथे गेल्या अनेक वर्षांपासून होळीच्या दिवशी होळी लागल्यानंतर, खेळला जाणारा हा एकमेवाद्वितीय साहसी खेळ!
होळीसाठी वस्तूरुपी ठेवलेला प्रसाद आळीतील एक विशिष्ट गट होळी लागताच घेऊन पळवतो. त्यामुळे आळीतील दुसऱ्या गटाला हा प्रसाद मिळत नाही. म्हणून प्रसाद घेऊन गेलेला गट दानव होतो, तर प्रसाद न मिळालेला गट देव.
यानंतर या दोन्ही गटामध्ये युद्धास सुरवात होते. हे दोन्ही गट एकमेकांवर होळीमधील जळती लाकडं फेकतात आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची युद्ध स्वरूप प्रथा पार पडते.
विशेष म्हणजे आजपर्यंत यात कुणालाही कोणत्याही प्रकारची ईजा किंवा कोणताही घातपात झालेला नाही, हाही एक इतिहासच आहे.
हे देव – दानव युद्ध बघण्यासाठी संपूर्ण महाडकर आतुरतेने गवळ आळीत दरवर्षी गर्दी करतात आणि या प्रथेचा आनंद घेतात.
हेही वाचा :