Latest

बेळगाव शहरात अंडरग्राऊंड हायड्रॉलिक डस्टबीन

निलेश पोतदार

शहरात अंडरग्राऊंड हायड्रॉलिक डस्टबीन उभारले जाणार असून, याचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात 30 प्रभागांत हे डस्टबीन उभारले जाणार आहे. शहापुरात पहिले डस्टबीन तयार होत आहे. या अनोख्या प्रकल्पाची दखल पंतप्रधान कार्यालयानेही घेतली आहे. उघड्यावरील कचरा ही शहरांची डोकेदुखी बनली आहे. यासाठीच अंडरग्राऊंड हायड्रॉलिक डस्टबीन ची संकल्पना बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी पुढे आणली आहे.

कचरा साठलेले हायड्रॉलिक डस्टबीन उचलण्यासाठी कॉम्पॅक्टरसह क्रेन तयार केली आहे. एका डस्टबीनची कचरा साठवण्याची क्षमता एक टन इतकी राहणार असून, वेळोवेळी तो कचरा उचलला जाणार आहे.

सर्व काही सेन्सरवर

हायड्रॉलिक डस्टबीनचे काम सेन्सरवर चालणार आहे. या डस्टबीनमध्ये 75 टक्के कचरा साठला की, तो तातडीने उचलला जावा, यासाठी प्रभागातील स्वच्छता निरीक्षकाला मोबाईलद्वारे संदेश मिळेल. कचरा 90 टक्क्यांपर्यंत साठल्यास याचा संदेश महापालिका आयुक्त व संबंधित प्रभागाच्या नगरसेवकाला जाईल. त्यांनी तातडीने सूचना देऊन हे डस्टबीन रिकामे करायचे आहे. 100 टक्के कचरा साठला आणि तो उचलला नाही तर संबंधित स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता कर्मचार्‍यांवर दंडात्मक कारवाई करता येणार आहे.

प्रत्येक प्रभागात 2 डस्टबीन

पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर 30 प्रभागांत प्रत्येकी एक अंडरग्राऊंड डस्टबीन तयार केले जाणार आहे. पहिल्या डस्टबीनचे काम शिवाजी उद्यानजवळ सुरू झाले आहे. 15 दिवसांत यासाठी आवश्यक असलेले 50 लाखांचे कॉम्पॅक्टर विथ क्रेन बेळगावात दाखल होणार आहे. 30 प्रभागांनंतर उर्वरित 28 प्रभागांमध्ये एकेक डस्टबीन व त्यानंतर एकूण 58 प्रभागांमध्ये दुसरे डस्टबीन तयार केले जाणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रभागात दोन यानुसार 116 अंडरग्राऊंड डस्टबीन तयार होणार आहेत. त्यानुसार कचरा उचल वाहनांची संख्याही वाढणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पासाठी दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

देशातील पहिलीच अंडरग्राऊंड हायड्रॉलिक डस्टबीनची संकल्पना बेळगावात राबवत आहोत. याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. कर्नाटक सरकारही बेळगावच्या स्मार्ट सिटी एमडींकडून याची माहिती घेत आहे.

– आ. अभय पाटील, बेळगाव दक्षिण

शहरात आगामी पुढील 15 दिवसांत अंडरग्राऊंड डस्टबीन तयार होईल. यासाठी खोदाईचे काम सुरू आहे. यासाठी आवश्यक क्रेनही लवकरच बेळगावात दाखल होणार असून, त्याद्वारे प्रत्यक्ष कचरा उचल होण्यास सुरुवात होईल.

– रूद्रेश घाळी, महापालिका आयुक्त, बेळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT