Uncategorized

सोलापूर : बेवारस मृतदेहावर मायेचे पांघरुण

मोहन कारंडे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सध्याच्या युगात रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाही बेवारस म्हणणारे असंवेदनशील लोक आहेत. पण बेवारस मृतदेहावर मायेचे पांघरून घालणारे लोक क्वचितच पहायला मिळतात. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराजवळ मुंग्या लागलेला बेवारस मृतदेह पडला होता. दोघा तरूणांनी तो ग्रामीण रुग्णालयात पोहचवला. एवढेच नाही तर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचाही त्यांनी शोध घेतला. सोहेल फरास व रशीद खिस्तके अशी या तरूणांची नावे आहेत. तर शामसुंदर पालीवाल असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंत असताना आधार द्या, असे वाक्य प्रचलित आहे. जिवंतपणी मदत न करता मेल्यानंतर कळवळा व्यक्त करण्याबरोबरच दया, माणुसकी याचे गोडवे गात त्या व्यक्तीबद्दल कौतुक केले जाते. तसे पाहिले तर हा मनुष्य स्वभावच; त्याला काही व्यक्ती अपवाद पण असतात. याची प्रचिती अक्कलकोटमध्ये आली. स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असताना सोहेल फरास व रशीद खिस्तके यांना मंदिराजवळ अनोळखी व्यक्ती अत्यंत बिकट अवस्थेत पडली असल्याची माहिती मिळाली. दोघांनीही हातातील काम सोडून घटनास्थळी धाव घेतली. बेशुदावस्थेत पडलेल्या व्यक्तीची पाहणी केली असता तो मृत असल्याचे समजले. शिवाय बेवारस मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या. जीवनात असंख्य यातना भोगून 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' असा दिलासा देणाऱ्या चक्क स्वामी समर्थांच्या मंदिर परिसरातच तो गतप्राण झाला होता. त्याच्याजवळ असलेल्या बॅगेत आधार कार्ड व मोबाईल नंबर मिळाला. त्यावरून मृत व्यक्ती बीड जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे समजले. त्यांनी नातेवाईकांशी संपर्क करून माहिती दिली. तसेच पोलिसांना माहिती दिली व रुग्णवाहिकेतून अक्कलकोटच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेह घेवून गेले. एका पायाने अपंग असलेल्या शामसुंदर हे एक वर्षापूर्वी मंदिर परिसरात आले होते. ते भीक मागून उदरनिर्वाह करायचे. येणारे भाविक त्याला मदतही करायचे. असे या घटनेनंतर येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT