उस्मानाबाद : गावठी दारू अड्ड्यावर छापा; सव्वा लाख रुपयाचे रसायन जप्त | पुढारी

उस्मानाबाद : गावठी दारू अड्ड्यावर छापा; सव्वा लाख रुपयाचे रसायन जप्त

उमरगा , पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पळसगाव तांडा तलावालगत असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर बधवारी (दि. 27) सकाळी साडे सातच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकून अड्डा उध्वस्त केला. या छाप्यात सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  श्रावण महिना सुरवातीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीमुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती नुसार पळसगाव तांडा येथे तलावालगत गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती उमरगा पोलिसाना मिळाली होती. यानुसार विभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार बुधवारी सकाळी पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठौड, सहाय्यक पोलिस निरिक्षक, आर बी जाधवर, पोलिस उपनिरिक्षक रमाकांत शिंदे, पोहेकॉ दिगंबर सुर्यवंशी, वाल्मिक कोळी, विजय कुमार कांबळे, मनाजी पाटोळे, संभाजी घुले, महिला पोलिस आदि 20 कर्मचार्‍याच्या फौजफाट्यासह रोडवर वाहने उभी करून पळसगाव पाझर तलावाजवळ सुरू असलेल्या गावठी दारू अड्डयावर धाड टाकली.

या धाडीत 1 लाख 13 हजार 400 रूपयाची गुळ मिश्रीत रसायन, साहित्यासह हातभट्टी दारू आढळून आली. दरम्यान पोलिसाचे
पथक येत असल्याचा सुगावा लागताच मनोज सिताराम पवार, मधुकर थावरु राठोड, संजय उमाजी राठोड व निळकंठ पुना राठोड (सर्व रा. पळसगाव तांडा) हे चौघेही तेथील झाडी व ऊसाच्या शेताचा फायदा घेत प्रसार झाले. या प्रकरणी पोलिस नाईक मानाजी पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उमरगा पोलिसांत चौघांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोहेकॉ नागनाथ वाघमारे हे करीत आहेत.

पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दोनशे लिटर क्षमतेसह सहा इतर वेगवेगळ्या आकारांच्या बॅरलमध्ये गूळ मिश्रित 2200 लिटर रसायन, प्लॅस्टिकच्या घागरीतील हातभट्टी दारू, तेथील दारु बनविण्याचे साहित्य, साधने, लोखंडी ड्रम आदीसह सर्व मिळून 1 लाख 13 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून गावठी दारू बनविण्याचा अड्डा उद्ध्वस्त केला.

Back to top button