सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील काँग्रेस भवनाच्या बाहेरील बाजूस लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बॅनरवर काळी शाई फेकण्याचा प्रकार शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास उघडकीस आला. यावेळी काँग्रेस नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या फोटोवर दगडफेक करून शाई फेकण्यात आली.नेमकी शाई कुणी फेकली हे मात्र समजू शकले नाही.शाई फेकून संबंधित पसार झाला.
शाई फेकण्याचे कळताच कार्यालयीन कर्मचारी राजू नीलगंठी यांनी सर्व बॅनर साफ करून घेतले. भिंतीवर मात्र तशीच शाही दिसत होती. ही माहिती मिळताच शहराध्यक्ष प्रकाश वाले हे काँग्रेस भवनात आले त्यांनी याची पाहणी केली.
काँग्रेस भवनाच्या बाहेर शहराध्यक्ष प्रकाश वाले ,युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे ,एनएसयुआय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांची फलक आहेत. या तिन्ही फलकावर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे फोटो आहे.त्या फोटोवर काळी शाई फेकून मारण्यात आली आहे.
मागील दोन दिवसापूर्वी काँग्रेस भवन मध्ये शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि माजी परिवहन समितीचे सभापती केशव इंगळे यांच्या मध्ये हमरीतुमरी झाली होती.त्यानंतर प्रकाश वाले यांनी थेट राजीनामा देतो, अशी घोषणा माइक घेऊन केली हाेती.
भवनाच्या बाहेरील असलेल्या फलकांवर काळी शाई फेकण्याचा प्रकार घडला . त्या वादातून तर हा प्रकार घडला नाही ना असे तर्क वितर्क काढले जात आहेत.
काँग्रेसचे शहराध्यक्ष वाले व ज्येष्ठ नेते सुनील रसाळे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहरांमध्ये सध्या चांगले काम सुरू आहे .
त्यामुळे अनेकांना ते बघवत नाही. हिम्मत असेल तर समोर येऊन लढा लपून, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
हेही वाचलं का?