Uncategorized

पिसाळलेल्या मांजराच्या हल्ल्यात पाचजण जखमी

Shambhuraj Pachindre

कोडोली पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यातील पोखले येथे पिसाळलेल्या मांजराने (बोका) केलेल्या हल्ल्यात पाचजण गंभीर जखमी झाले. गावात या मांजराकडून धुमाकूळ सुरू असून, प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. मांजराच्या चाव्याने गंभीर जखमी झालेल्यांवर कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गावातील मराठी शाळेशेजारील वसाहतीतील सुभाष सदाशिव पाटील (वय ६८) हे कामानिमित्त घरातून बाहेर पडले असता त्यांच्यावर पाठीमागून अचानक हल्‍ला करून या पिसाळलेल्या मांजराने त्यांच्या उजव्या पायाची पेंढरी व मांडीचे दोन ठिकाणे लचके तोडले. पाटील यांनी आरडाओरडा केल्याने मांजर पळून गेले. त्यानंतर मांजर गल्‍लीत शिरले व विमल सुभाष पाटील (६०), शहाजी नारायण पाटील (२८), सुरेखा शिवाजी पाटील (६७), दिनकर बापू जाधव (७०) यांचेही लचके तोडून त्यांना रक्‍तबंबाळ केले.

मांजराने भरगल्‍लीत अचानकपणे केलेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली. मांजर शरीराने धिप्पाड असून, ते पाठीमागून अचानकपणे हल्‍ला करून जखमी करते व पळून जाऊन घराच्या छतावर लपून बसत असल्याने त्याला पकडणे नागरिकांना मुश्कील झाले आहे. शेजारीच शाळा असल्याने हे पिसाळलेले मांजर कोणत्याही क्षणी शाळेत मुलांवर हल्‍ला करण्याची भीती पालकांतून व्यक्‍त होत आहे. पिसाळलेल्या मांजरामुळे रेबीज हा महाभयंकर आजार होऊ शकतो. त्यामुळे ग्रामपंचायत किंवा वनविभागाने या मांजराचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांंतून होत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT