

बीजिंग ः चीनने एक मोठा दावा केला आहे. पृथ्वीबाहेरही जीवसृष्टीची शक्यता आहे असे चीनने म्हटले आहे. चीनमधील स्काय आय टेलिस्कोपने काही असे सिग्नल्स पकडले आहेत जे कधीही पृथ्वीवर आढळले नव्हते. याबाबतचा खुलासा सर्वात आधी चीनच्या 'सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेली' या सरकारी दैनिकाने केला होता. मात्र, काही वेळातच या शोधाशी निगडीत रिपोर्ट आणि सोशल मीडिया पोस्टस् डिलिट करण्यात आले.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार जगातील सर्वात मोठी टेलिस्कोप 'स्काय आय'ने नॅरो-बँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल पकडले आहेत. सध्या या सिग्नल्सची तपासणी सुरू आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार चिनी दैनिकाने प्रमुख संशोधक झांग टोंजी यांचा हवाला देत म्हटले होते की आता मिळालेले सिग्नल्स आधी पकडलेल्या सिग्नल्सपेक्षा पुष्कळ वेगळे आहेत. अर्थात टोंजी यांनी म्हटले आहे की हा केवळ एक रेडिओ इंटरफेरेन्सही असू शकतो. 'सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेली'ने याबाबतचे वृत्त आपल्या वेबसाईटवरून का डिलिट केले हे स्पष्ट झालेले नाही. हे चीनच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकृत वृत्तपत्र आहे.
अर्थात रिपोर्ट डिलिट होण्यापूर्वीच ही खबर अनेक मीडिया आऊटलेटस्नी प्रसिद्ध केली होती. तसेच चीनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवरही रिपोर्ट व्हायरल झाला होता. त्यामधील माहितीनुसार यापूर्वी 2020 आणि 2022 मध्येही दोन प्रकारचे संदिग्ध सिग्नल डिटेक्ट करण्यात आले होते. स्काय आय टेलिस्कोप सप्टेंबर 2020 मध्ये लाँच करण्यात आले होते. चीनच्या नैऋत्येकडील प्रांत गुइझोऊमध्ये हा टेलिस्कोप आहे. त्याचा व्यास 500 मीटर असून हा टेलिस्कोप लो फ्रीक्वेन्सी रेडिओ सिग्नल्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.