पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मेंदू असतो अधिक गरम! | पुढारी

पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मेंदू असतो अधिक गरम!

लंडन : ब्रिटीश संशोधकांनी केलेल्या एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मेंदू अधिक गरम असतो. अर्थात या संशोधनात रागाचा संबंध अजिबात नाही व त्यामुळे महिला पुरुषांपेक्षा अधिक रागीट असतात असा सोयीचा अर्थ काढण्याचीही गरज नाही. हे संशोधन केवळ मेंदूच्या तापमानाबाबत आहे! महिलांचा मेंदू हा पुरुषांच्या तुलनेत अर्ध्या अंशापर्यंत अधिक गरम असतो. विशेषतः दिवसाच्या काळात महिलांच्या मेंदूचे तापमान सुमारे 40.9 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते.

केम्बिजच्या एमआरसी लॅबोरेटरी फॉर मॉलिक्यूलर बायोलॉजीच्या संशोधनातून याबाबतची माहिती समोर आली आहे. शरीराच्या अन्य भागांचे तापमान ज्यावेळी 37 अंश सेल्सिअसपर्यंत असते त्यावेळी मेंदूचे सरासरी तापमान 38.5 अंश सेल्सिअस असते. अर्थात मेंदूच्या आतील भागांचे तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंतही गरम होऊ शकते. कदाचित मासिक पाळीमुळे महिलांच्या मेंदूचे तापमान अधिक होत असावे, असे संशोधकांना वाटते. संशोधक डॉ. जॉन ओनील यांनी सांगितले की संशोधनात सर्वात थक्‍क करणारी ही बाब समोर आली की अनेक वेळा माणसाच्या मेंदूचे तापमान बरेच वाढते.

जर शरीराचे तापमान वाढले तर आपण त्याला ‘ताप आला’ असे म्हणतो. मात्र, मेंदूबाबतचे इतके तापमान आतापर्यंत अशाच लोकांबाबत नोंदवले गेले जे कधी डोक्याच्या दुखापतीने ग्रस्त होते. मेंदूचे तापमान वाढत्या वयाबरोबरही वाढते. वाढत्या वयाबरोबर मेंदूला ‘कूल डाऊन’ करण्याची क्षमता कमी होऊ लागते. हे एखाद्या मेंदू विकारामुळे होते की नाही याबाबत अखिक संशोधन करण्याची गरज आहे.

Back to top button