पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
येथील माऊलीनगर व मंगलमूर्तीनगर मध्ये एकाच रात्री दोन बंद घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला. बंद घराच्या दरवाजांचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागदागिने व शिवण्यासाठी आणलेले पंधरा-वीस शर्ट व पॅन्टचे नवीन कोरे कापड तसेच रोख रक्कम असा अंदाजे पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या आठवड्यातील चोरीची ही पाचवी घटना घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंगलमूर्तीनगर मध्ये घटनास्थळी पंचनामा केला. येथील सटाणा रस्त्याला लागून असलेली नव्या वसाहती मधील मंगलमूर्तीनगरमध्ये राहणारे ग्रामपंचायत सदस्य मीना ठाकरे बाहेरगावी गेल्या गेल्या होते. शिवाय, शेतात कांदे लागवडीचे काम सुरू असल्याने सलग तीन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ठेवलेल्या अंदाजे पाच तोळे सोन्याचे दागिने व इतर वस्तू चोरून नेल्या. तसेच वरच्या मजल्यावर खोल्यांमध्ये असलेले कपाटातील काही वस्तू व सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. यात ठाकरे यांच्या सुनेची अंगठी, मुलाची सोन्याची अंगठी व सोन्याची चैन, मीना ठाकरे यांची सोन्याची चैन तसेच इतर किमती पॅन्ट शर्ट शिवण्यासाठी आणलेले नवीन कोरे कापड असा अंदाजे अडीच लाख व रोख ५० हजार असा तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. पोपट ठाकरे हे कोकणगाव येथून दुपारी घरी आल्यानंतर त्यांच्या चोरी झाल्याचे लक्षात आले. तसेच माऊलीनगर मधील लताबाई अहिरराव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील ७५ हजार रोख व दीड तोळे सोने असा एकूण दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.