नाचनवेल; पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक व जवखेडा खुर्द येथील अंजना नदीच्या रस्त्यावरील पुल पहिल्याच पुरात वाहून गेला. औरंगाबादला जोडणारा सर्वात जवळचा हा मार्ग बंद झाल्याने ग्रामस्थांना शहरात जाण्यासाठी नाचनवेल व कन्नड मार्गाने जास्त अंतर पार करून जावे लागत आहे. नदी पार करून शाळेत जावे लागत असल्याने पूलाअभावी शालेय विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे.
अनेक दिवसांपासून या पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले होते. तसेच पावसाळ्यात पुलावरून पाणी जात असल्याने वाहनचालकांना तारेवरती कसरत करावी लागत होती. हा पूल पुराच्या पाण्यात होऊन गेल्याने जवखेडा बुद्रुक व जवखेडा खुर्द या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.
गेल्या वर्षीही पुराच्या पाण्यात हा पूल वाहून गेला होता; पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी या पुलाची तात्पुरत्या स्वरूपात
डागडुगी करून पर्यायी रस्ता सुरू करण्यात आला होता. नदी पार करूनच शाळेत जावे लागत असल्याने पूलाअभावी जवखेडा खुर्द व जवखेडा बुद्रुक येथील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने या पुलांची दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिलेला आहे.