छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने घेतलेला खासगीकरणाच्या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या विरोधाची धार लक्षात घेत त्यांनी या निर्णयावर पुनर्विचार करून हा निर्णय रद्द करावा, असे मत केंद्रीय सामाजिक राज्य न्याय मंत्री तथा रिपाइचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी (दि. २४) पत्रकार परिषदेत मांडले.
आठवले बीड येथील कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरात दाखल झाले. त्यांनी सुभेदारी विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधत खासगीकरणाला विरोध केला. यावेळी त्यांनी केंद्राप्रमाणे राज्यातही महायुतीत सहभाग सांगणार असल्याचे सांगून लोकसभेच्या ४८ पैकी ४२ जागा निवडून येतील, असा दावा केला. नुकतेच महिला आरक्षणांवर बोलताना त्यांनी सांगितले की, हा निर्णय चांगला असून याचा लाभ २०२९ मध्ये महिलांना मिळणार असल्याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मिलिंद शेळके, पप्पू कागदे, नागराज गायकवाड, ब्रम्हानंद चव्हाण, अवसरमल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभेच्या मैदानात शिर्डी येथून उतरण्याचा मानस आहे. परंतु मागील पराभव पाहता अभ्यास करूनच पुढील निर्णय घेणार आहे. त्याच बरोबर महायुतीने निवडून आणण्याची खात्री दिली तरच मी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात आम्हाला एक मंत्रीपद व काही महामंडळाचे अध्यक्षपद देण्याची मागणी सहकाऱ्यांकडे आम्ही करीत आहोत. मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी देण्याचा शब्द सहकाऱ्यांकडून मिळाला होता. परंतु, अजित दादांची एन्ट्री होताच आमच्या आगोदर त्यांचा विस्तार झाला. आता विस्तारात आमचा विचार करा, असा अप्रत्यक्ष टोला सहकाऱ्यांना लगावला.