Uncategorized

Pune News : रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग : अर्चना पांडे

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशरक्षणासाठी सदैव तत्पर असणार्‍या सैनिकांच्या पाठीशी त्याची पत्नी सतत असतेच अन् त्याच्यासारखीच रात्रंदिन लढत असते. अशा 22 सैनिकांच्या पत्नींनी त्यांचे अनुभव पुस्तकरूपाने आणले आहेत, अशी भावना देशाचे लष्करप्रमुख मनोज पांडे यांच्या पत्नी अर्चना पांडे यांनी येथे व्यक्त केली. पांडे यांच्या हस्ते शुक्रवारी आर्मी वाईव्ह्ज वेलफेअर असोसिएशनच्या (आवा) वतीने 'अभिव्यक्ती' या लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, दोन वर्षांपासून सैनिकांच्या पत्नींच्या अभिव्यक्तीला वाव मिळावा म्हणून लिटरेचर फेस्टिव्हलचे आयोजन केले जात आहे.

तिसरा फेस्टिव्हल यंदा पुण्यात होत आहे. पांडे म्हणाल्या की, कोविड काळात सैनिकांच्या पत्नींची अभिव्यक्ती आम्हाला जास्त जाणवली. अनेक जणींनी कथा व कवितारूपाने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यातून अभिव्यक्ती या लिटरेचर फेस्टिव्हलचा जन्म झाला. पहिला दिल्ली, जयपूरनंतर तिसरा फेस्टिव्हल पुण्यात 27 ते 29 ऑक्टोबरदरम्यान सदर्न कमांडच्या आवारात होत आहे. ज्यांचा नवरा लष्करात आहे, त्या पत्नींना बाहेरच्या वातावरणात जायला मिळत नाही. या माध्यमातून आम्ही सामान्य लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतोय. सदर्न कमांड येथील राजेंद्रसिंग संस्थेच्या आवारात हा लिटरेचर फेस्टिव्हल सुरू आहे. या आवारात पुस्तकांचे झुंबर, फ्लॉवरपॉट, तोरणही कल्पकतेने करण्यात आले आहे. वर्तमानपत्रांचा वापर करून विलोभनीय भीत्तिचित्रेही तयार केली आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT