Uncategorized

करेवाडीत रंगणार राजकीय कलगीतुरा; भरणे, पडळकर, हर्षवर्धन एकाच मंचावर

अमृता चौगुले

वरकुटे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा

अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती करेवाडी (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी (दि. 3) साजरी करण्यात येणार आहे. या वेळी इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अहिल्यादेवींचे वंशज भूषणराजे होळकर हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जयंतीनिमित्त दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि टीव्ही स्टार कुमारशेठ देवकाते यांच्यासोबत महिलांसाठी 'होम मिनिस्टर' (खेळ पैठणीचा) या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

अहिल्यादेवी जयंतीनिमित्त चौंडी (जि. नगर) येथील तणावपूर्ण कार्यक्रमानंतर प्रथमच पवारांच्या बालेकिल्ल्यात सार्वजनिक कार्यक्रमासाठी आ. पडळकर येत असल्याने पूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. पडळकर यांची तोफ कोणावर कशी धडाडणार, याची उत्सुकता लोकांमध्ये आहे. तालुक्याचे विद्यमान आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रथमच जयंतीनिमित्त एका मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जयंती कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT