Uncategorized

औरंगाबाद गारठले, चार दिवस पावसाचाही अंदाज

अमृता चौगुले

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : शहरात तापमानाचा चढ उतार सुरु असून काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीने दोन दिवसांपासून जोर धरला आहे. पहाटे व सुर्यास्तानंतर थंड वारे वाहत असल्यामुळे शहरात गारवा वाढला आहे. शहरात थंडीचा जोर वाढला असतानाच दुसरीकडे हवामान विभागाच्या अंदाजानुसार येणाऱ्या आठवड्यात चार दिवस शहरात पावसाची शक्‍यता असणार आहे. दरम्यान चिकलठाणा वेधशाळेत शनिवारी शहराचे किमान तापमान ७.५ तर कमाल तापमान २८.८ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले.

शहराचे शुक्रवारी किमान तापमान ७.९ अंश सेल्सियस होते. शनिवारी तापमानात आणखी घसरण झाली असून तापमान ७.५ अंश सेल्सियसवर पोहचले. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट झाल्यामुळे संध्याकाळी थंड वाऱ्यांमुळे प्रचंड थंडी जाणवत आहे. शहराच्या तापमानात सातत्याने तापमानात चढ उतार होत आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहराचे तापमान १० ते १२ अंश सेल्सियदरम्यान होते.

३ डिसेंबर रोजी १३.४ अंश सेल्सियस, ४ डिसेंबर रोजी १६.६ अंश सेल्सियस तर ५ डिसेंबर रोजी शहराचे किमान तापमान १७.५ अंश सेल्सियस होते, यानंतर आठवडाभर तापमानात सातत्याने घट झाली आहे. शुक्रवारी शहराचे तापमान ७.९ अंशापर्यंत घसरले तर शनिवारी तापमान ७.५ अंश सेल्सियसपर्यं पोचले. वातावरणातील अचानक बदलामुळे थंडीने शहराला कवेत घेतले असून या बदलामुळे सर्वसामान्य नागरीक मात्र त्रस्त झाले आहेत. यंदा शहरवासीयांना यावर्षी गुलाबी थंडी जरा उशिरानेच अनुभवायला मिळाली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरात येणाऱ्या आठवड्यामध्ये तापमानामध्ये वाढ होणार असल्यामुळे थंडी कमी होण्याची शक्यता आहे.

शहरात चार दिवस पावसाची शक्‍यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यामध्ये शहरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसणार आहेत. ११ ते १४ डिसेंबर या कालावधीत शहरात पावसाच्या सरी बरसतील. संपूण आठवडाभर ढगाळ वातावरण राहणार असून या कालावधीत शहराचे किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सियस तर कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सियस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT