औरंगाबाद : कुलगुरूंची स्वाक्षरी नसलेली प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना प्रदान : पैठण संतपीठाचा भोंगळ कारभार

औरंगाबाद : कुलगुरूंची स्वाक्षरी नसलेली प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना प्रदान : पैठण संतपीठाचा भोंगळ कारभार

पैठण: पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित पैठण संतपीठातून पूर्ण केलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या पदवी प्रमाणपत्रावर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची स्वाक्षरी नसल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही प्रमाणपत्रे १५० विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीक्षान्त सोहळ्यात प्रदान करण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलेली प्रमाणपत्रे परत घेण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण येथील संतपीठामधून २०२१ या वर्षात १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी श्री तुकाराम गाथा ग्रंथ परिचय यासह विविध संत अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केला होता. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्याचा दीक्षांत सोहळा शुक्रवारी (दि. ९) पैठण संतपीठामध्ये पार पडला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.

प्रमाणपत्रवर साक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरूंची स्वाक्षरी आणि विद्यापीठाची मुद्रा अंकित करण्यात येते. परंतु, अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना कुलगुरू यांची स्वाक्षरी नसलेली प्रमाणपत्रावर देण्यात आले. दीक्षांत सोहळा संपल्यानंतर हा प्रकार काही विद्यार्थी व विद्यापीठच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे वितरीत केलेली प्रमाणपत्रे विद्यापीठ प्रशासनाने परत घेतली. त्यामुळे बाहेर गावावरून आलेले विद्यार्थी विना प्रमाणपत्राशिवाय माघारी परतले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news