औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा अवमान करणारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध आंबेडकरी जनता आक्रमक झाली असून, शनिवारी (दि. 10) काही ठिकाणी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, तर काहींनी पोलिसांकडे धाव घेत त्यांच्याविरुद्ध अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानपुरा येथील गोपाल टी हाऊस येथे पाटलांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी योगेश बन यांच्यासह प्रभाकर बकले, सुरेश मगरे, मनोज वाहूळ अशा तेरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच वंचितचे युवक प्रदेश अध्यक्ष अमित भुईगळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांना एक निवेदन देत चंद्रकांत पाटलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी भुईगळांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अॅट्रासिटीनुसार गुन्हा दाखल करा
भाजप नेत्यांनी अनेकदा विविध महापुरुषांच्या बाबतीत अपशब्द वापरले आहेत. त्यांच्याविरुध्द तक्रार देऊनही कारवाई केली गेली नाही. कायदा व संविधानाचा सातत्याने अवमान केला जात आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पाटील यांनी जातीय व्देष भावनेतून वक्तव्य केले आहे. पाटील यांचे विरुध्द त्वरित अॅट्रासिटी अॅक्ट अनुसार गुन्हा दाखल करावा व त्यांना पदावरून निलंबित करावे, अशा आशयाचे निवेदन सिटीचौक पोलीस ठाण्यात देण्यात आले. या निवेदनावर माजी नगरसेवक संजय जगताप, गौतम खरात, किशोर गडकर, कडूबा गवळे, सचिन नवगिरे, राजू थोरात, दिलीप जाधव, नंदू परदेशी, देविदास आढाव, शाहरूख पटेल, विजय रगडे, राहुल बोर्डे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अधिक वाचा :