पुढारी ऑनलाईन डेस्क : परवा म्हणजे मंगळवार २० जून राेजी पहिला गद्दार दिन साजरा होणार आहे. हा दिन साजरा करणाऱ्या गद्दारांनी शिवसेनेवर वार केले आहेत, अशा शब्दांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर हल्लाबाेल केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी आज ( दि. १८) ठाकरे गटाचा मेळावा मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभाई पटेल संकुल येथे पार पडला. यावेळी ते बोलत हाेते.
यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवरही जाेरदार टीका केली. ते म्हणाले, केंद्र सरकार सत्तेच्या अहंकारात मस्त आहे. मणिपूरमध्ये आज हिंसाचार सुरु आहे. केंद्र सरकारने सीबीआयसह केंद्रीय यंत्रणा मणिपूरमध्ये पाठवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दाैरा करणार आहेत; पण मणिपूरला जायला तयार नाहीत. मणिपूर माझ्या देशातल एक राज्य आहे. ते पेटलेलं आहे. मणिपूर शांत करून दाखवा. मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावं, असं आव्हान ठाकरेंनी यांनी दिले.
भाजप चुकीचे पायंडे पाडत आहे. देश पंतप्रधानांपेक्षा मोठा आहे, हे लक्षात ठेवा असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली
उद्या म्हणजे १९ जून राेजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. तर परवा मंगळवार २० जून हा जागतिक गद्दार दिन. आपल्या लोकांनी केलेल्या गद्दारीला २० जूनला एक वर्ष पूर्ण होईल. मात्र त्यानंतर मागील वर्षभर आम्हाला जी लोकं भेटतायत ते शिवसैनिक, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळे सांगत आहेत की, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कोव्हिडमध्ये आपण काय काम केलं ते तुम्ही आणि सगळ्यांनीच पाहिलं आहे. 'जो सुखमें साथ रहते है उनको रिश्ते कहते हैं जो दुखमे साथ देते हैं उन्हे फरिश्ते कहते हैं'. तुम्ही जोपर्यंत माझ्यासोबत आहात तोपर्यंत कितीही शाह आणि अफझल खान आले तरी मला पर्वा नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा