मुंबई; पुढारी वृत्तसेवा : Uday Samant : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ती काळजी घेऊनच महाविद्यालये सुरू करण्याचा आमचा विचार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
४ ऑक्टोबरपासून राज्यातल्या शाळा सुरू होणार आहेत. मात्र महाविद्यालये कधी सुरू होणार? या राज्य सरकारला सवाल केला जात आहे. या पार्श्वभूमिवर मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदे महत्त्वाची माहिती दिली.
मंत्री सामंत म्हणाले की, महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ती काळजी घेऊनच महाविद्यालये सुरू करण्याचा आमचा विचार आहे. परंतु, पटसंख्या हाच महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी कशा पद्धतीचे समीकरण करायचा यावर विचार करुनच महाविद्यालये सुरू करणार आहोत.
१ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. मात्र, मागच्या वेळी गैरसमज असा झाला की, तेव्हापासून महाविद्यालये सुरू होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरू करण्यात यावी असे यूजीसी आणि एआयसीटीईने सांगितले आहे. मात्र आपल्याकडे त्या काळात दिवाळीचा सण असल्याने त्या काळात महाविद्यालये सुरू करता येणार नाहीत. त्यानंतरच कदाचित महाविद्यालय सुरू करण्यात येतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
मंत्री सामंत म्हणाले की, अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली. कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले टाकत आहोत, असं उदय सामंत यांनी सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून निर्णय होईल, असंही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात पूरपरिस्थिती आहे, त्यामुळे सीईटी परीक्षा पुन्हा घ्यावा लागत आहेत. सीईटी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पण सीईटी परीक्षा अजून पुढे गेल्या तर मात्र कॉलेज सुरु व्हायला आणखी वेळ लागणार आहे. भविष्यात एकही विदयार्थी सीईटीपासून वंचित राहणार नाही, असा फॉर्म्युला आम्ही तयार केला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.