पुढारी ऑनलाईन डेस्क : भेदक गोलंदाजी आणि त्याला तेवढीच दमदार फलंदाजीच्या जोरावर १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषकाला टीम इंडियाने गवसणी घातली. या स्पर्धेत इंग्लंडचा संघाने सर्व सामने जिंकले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात इंग्लंड बाजी मारेल, असे भाकित इंग्लंडमधील क्रिकेट विश्लेषक व्यक्त करत होते. मात्र भारतीय संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट क्रिकेट खेळीचे प्रदर्शन करत भारताचे नाव विश्वचषकावर कोरले. या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय पुरुष संघाने १९८३ मध्ये इंग्लंडमध्ये जिंकलेल्या विश्वचषक स्पर्धेतील विजयाचे स्मरण क्रिकेटप्रेमींना करुन दिले आहे. (U19 Women's T20 WC)
नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने चांगली सुरुवात केली. भारताने केलेल्या तिखट माऱ्यापुढे इंग्लडच्या एकाही फलंदाजाला चांगली धावसंख्या उभारता आली नाही. भारताने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. षटकातील चौथ्या चेंडूवर तीतस साधूने लिबर्टी हीपला बाद केले. तिने आपल्याच चेंडूवर लिबर्टीचा झेल घेतला. ढीगला खातेही उघडता आले नाही. 15 धावांवर इंग्लंडची दुसरी विकेट पडली. अर्चना देवीने हॉलंडला क्लीन बोल्ड केले. हॉलंडने आठ चेंडूंत दहा धावा केल्या. (U19 Women's T20 WC)
अर्चना देवीने एका षटकात दोन विकेट घेत इंग्लंड संघाला अडचणीत आणले. तिने इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सला गोंगडी त्रिशालाकरवी झेलबाद केले. 22 धावांवर इंग्लंडची चौथी विकेट पडली. तीतास साधूने सेरेन स्मेलला क्लीन बोल्ड केले. स्मालेने नऊ चेंडूत तीन धावा केल्या. पार्श्वी चोप्राने भारताला पाचवे यश मिळवून दिले. तिने चारिस पावलीला एलबीडब्ल्यू आऊट केले. पावलीने नऊ चेंडूत दोन धावा केल्या. 10 षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या पाच विकेट्सवर 39 अशी होती.53 धावांच्या स्कोअरवर इंग्लंडची सातवी विकेट पडली. सौम्या तिवारीने आपल्या अचूक थ्रोने जोशी ग्रोव्ह्सला धावबाद केले.
५३ धावांच्या स्कोअरवर इंग्लंडची आठवी विकेट पडली. कर्णधार शेफाली वर्माने हेना बेकरला यष्टिरक्षक रिचा घोषच्या हातून स्टंप आऊट केले. पहिल्याच चेंडूवर हेना पॅव्हेलियनमध्ये परतली आणि तिला खातेही उघडता आले नाही. 68 धावांच्या स्कोअरवर इंग्लंडची नववी विकेट पडली. मन्नत कश्यपने अलेक्सा स्टोनहाऊसला सोनम यादवकरवी झेलबाद केले. अलेक्साने 25 चेंडूत 11 धावा केल्या. 68 धावांवर इंग्लंडचा डाव गुंडाळला.
टीम इंडियाच्या तितस साधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर, शेफाली वर्मा, सोनम यादव आणि मन्नत कश्यप यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या. फलंदाजी करताना इंग्लंडच्या रायन मॅकडोनाल्ड गेने सर्वाधिक १९ धावा केल्या. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने ३ फलंदाज गमावत ऐतिहासिक विजय मिळवला.
शेफाली वर्मा, ऋचा घोष आणि श्वेता सेहरावतसारख्या स्टार खेळाडू असलेल्या टीम इंडियाला 69 धावांचे सोपे लक्ष्य होते. परंतु, इंग्लंडच्या गोलंदाजांनी डावाला चांगली सुरुवात केली. भारतीय डावाच्या तिसऱ्या षटकात कर्णधार शेफाली 15 धावांवर बाद झाली. पुढच्याच षटकात पाच धावा काढून श्वेता सेहरावतही बाद झाली. 20 धावांच्या आत भारताने आपल्या दोन महत्त्वाच्या फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. झटपट दोन विकेट गमावल्यामुळे भारतीय संघ दडपणाखाली आला होता. परंतु, सौम्या तिवारी आणि गोंगडी त्रिशा या जोडीने चांगली भागीदारी रचत संघावरील दडपण कमी केले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. मात्र, त्रिशा भारताच्या विजयापूर्वीच बाद झाली. तिने 29 चेंडूत 24 धावा केल्या. सौम्या तिवारीने 37 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. इंग्लंडकडून हॅना बेकर, ग्रेस स्क्रिव्हन्स आणि अलेक्सा स्टोनहाउसने प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा;