आळेफाटा, पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरून अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात अत्यंत कमी किमतीत विकणाऱ्या चौघा दुचाकी चोरांना आळेफाटा पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांनी एक, दोन नव्हे तर तब्बल ४५ मोटारसायकल चोरल्याची कबुली तपासात दिली आहे. त्याच्याकडून सुमारे २३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी दिली. आळेफाटा पोलिसांची मोटारसायकल चोरी प्रकरणातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
प्रमोद लक्ष्मण सुरकुटे (वय-२६), ज्ञानेश्वर रंगनाथ बिबवे (वय-२२), गणेश फक्कड कारखिले (वय-२३, सर्व रा. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर), आदिल मुख्तार अहमद कुरेशी (वय-२१ हल्ली रा. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर मूळ उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी सांगितले की, आळेफाटा पोलीस ठाणे हद्दीमधील गुंजाळवाडी येथून २९ मे रोजी शांताबाई बबन पावडे (रा. पळसपुर, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याच्या गळ्यातील मणीमंगळसुत्र जबरदस्तीने ओढुन अनोळखी इसमाने धूम ठोकली होती. त्यानुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यातील तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी तपास पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी बेल्हे, गुंजाळवाडी, राजुरी भागातील सीसीटीव्ही व तांत्रिक माहितीच्या आधार घेतला. अनोळखी इसम प्रमोद लक्ष्मण सुरकुंडे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याने मणीमंगळसुत्र चोरल्याची कबुली दिली. चोरी केलेला सोन्याचा मुद्देमाल त्यास कडुन जप्त केला.
दरम्यान आरोपीवर २०२१ मध्ये अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे येथे वाहन चोरीचा १ गुन्हा दाखल असल्याने त्या अनुषंगाने सखोल चौकशी केली. पोलिसांनी त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने ज्ञानेश्वर रंगनाथ बिबवे, गणेश फक्कड कारखिले, आदिल मुख्तार अहमद कुरेशी याच्या मदतीने पुणे ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या आळेफाटा येथील १, नारायणगाव १, ओतूर १, शिरूर ४, शिक्रापूर १, रांजणगाव एमआयडीसी ३, पुणे शहर अंतर्गत येणाऱ्या चंदननगर ३, बंडगार्डन १, फारसखाणा २, येरवडा १, लोणीकंद ३, पिंपरी चिंचवड अंतर्गत चिखली १, चाकण ३, अहमदनगर अंतर्गत पारनेर २,
कोतवाली २, शिर्डी १, नाशिक ग्रामीण अंतर्गत दिंडोरी १, हिंगोली ग्रामीण अंतर्गत हिंगोली ग्रामीण १, नवी मुंबई अंतर्गत रबाळे १, औरंगाबाद ग्रामीण अंतर्गत एमआयडीसी १ दुचाकी चोरल्याचे सांगितले सबंधित पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहे. आरोपींकडून आतापर्यंत एकुण ४५ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकलींपैकी ३५ गुन्हे उघडकीस आले असून उर्वरीत मोटार सायकलमालकांची ओळख पटवणे सुरू आहे. आरोपी सध्या आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरु आहे.
आळेफाटा पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलिसांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, महिला पोलीस निरीक्षक रागिणी कराळे, पोलीस हवालदार चंद्रा डुंबरे, विनोद गायकवाड, भीमा लोंढे, प्रकाश जढर, लहानू बांगर, अमित माळूंजे, पंकज पारखे, संजय शिंगाडे, पोपट कोकाटे, हनुमंत ढोबळे, मोहन आनंदगावकर यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करीत आहे.
https://youtu.be/7KwsutS10qQ