Latest

पुणे: मावळमध्ये खुनाचा बदला खूनच..!

अमृता चौगुले

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार पिस्तूलही हस्तगत करण्यात आली आहेत. पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही कामगिरी केली. या अटकसत्रानंतर मावळमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. प्रमोद सोपान सांडभोर (33, रा. हरणेश्वर वाडी, तळेगाव दाभाडे) आणि शरद मुरलीधर साळवे (30, रा. धनगर बाबा मंदिराच्या मागे काळेवाडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, इतर तिघेजण अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्या कारमध्ये तळेगाव दाभाडे एसटी स्टँड परिसरात फिरत होते. याबाबत गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी प्रमोद सांडभोर आणि शरद साळवी याला अटक केली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यांना चार पिस्तूल आणि काडतुसे मिळून आली आहेत.

पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत आरोपी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत किशोर आवारे यांचे निकटवर्तीय असल्याचे समोर आले. त्यामुळे आरोपी आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच प्लॅन करीत असल्याचा अंदाज पोलिस व्यक्त करीत आहेत. या प्लॅनमध्ये आणखी तीन जण सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक अंबरिश देशमुख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

भानू खळदे फरारच

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आवारात भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणी अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावे गुन्ह्यामध्ये सहभागी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात जनसेवा विकास समितीचे सदस्य व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे आणि त्यांचा मुलगा गौरव खळदे याचे नाव समोर आले. पोलिसांनी गौरव याला यापूर्वीच अटक केली आहे. मात्र भानू खळदे हा अद्याप फरार आहे.

शेळकेंनी घेतली आयुक्तांची भेट

किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पिस्तूल मागवल्याने मावळमधील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी नेमके कोणाचा खून करून बदला घेणार होते, याबाबत पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पोलिस आयुक्तालयात येऊन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेतली. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखीनच वाढले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT