कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन् : गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर शहर आणि परिसरात गव्यांचा वावर वाढला असून गुरुवारी पहाटे आणखी दोन गवे शहरात घुसले आहेत. जयंतीनाला आणि नागाळा पार्क परिसरात हे गवे आढळल्याने एकच तारांबळ उडाली. गवे आल्याने नागाळा पार्क, खानविलकर पेट्रोल पंप परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
पोलिसांबरोबरच वनविभाग, अग्निशमन दल बंदोबस्तासाठी तैनात केले आहे. काही प्राणी मित्र संघटनाही या परिसरात नजर ठेवून आहेत.
गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास एक गवा शहरात घुसला. विवेकानंद कॉलेज, नागाळा पार्क येथे २ गवा रस्त्यावर फिरस होते. पहाटे जेव्हा ही घटना कळली तेव्हा अनेकांनी मॉर्निंग वॉकला जाण्याचा बेत रद्द केला. काही अतिउत्साही बघ्यांनी गर्दी केली होती.
वनविभाग, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल को. म.न. पा. आपत्ती व्यवस्थापन पथक यांना पाचारण करण्यात आले असून त्याच्या मार्गवर आहेत.
गेल्या आठवड्यात पंचगंगा नदीच्या परिसरात गव्यांचा वावर वाढला होता. हा गवा भुयेवाडी परिसरात गेल्यानंतर काही बघ्यांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी गव्याने हल्ला केल्यानंतर तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.
बघ्यांची गर्दीमुळे अडथळे
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरात शुक्रवारी एकाच गोष्टीची दिवसभर चर्चा होती. शहरात आलेल्या या अनाहूत पाहुण्याला बघण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली. शुक्रवार पेठेतील जामदार क्लबजवळच्या झाडीत हा पाहुणा दिवसभर ठाण मांडून होता. गर्दीच्या गोंगाटाला वैतागून हा पाहुणा शेवटी सायंकाळी शिंगणापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.
कोल्हापूर शहरात आठ दिवसांपूर्वी पहाटे गवा घुसला. या महाकाय गव्याच्या आगमनाने शुक्रवार पेठेतील जामदार क्लब ते तोरस्कर चौक परिसरात तासभर घबराट निर्माण झाली होती. गंगावेश ते शिवाजी पूल या मार्गावरील जामदार क्लबसमोर महादेव मंदिराजवळील झाडीत या गव्याने दिवसभर ठाण मांडले.
गव्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात हुसकावून लावण्यासाठी वन विभागासह विविध यंत्रणांचे दिवसभर शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सायंकाळी पावणेपाच वाजता गवा उठून शिंगणापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. रात्री नऊनंतर पंचगंगा नदी पार करून तो कोल्हापूर-पन्हाळा रस्ता पार करून वडणगेच्या दिशेने मार्गस्थ झाला.
हेही वाचा :