कोल्हापूर : ‘तो’ गवा पहाटे पेठवडगावात | पुढारी

कोल्हापूर : 'तो’ गवा पहाटे पेठवडगावात

पेठवडगाव; पुढारी वृत्तसेवा : एका युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला तो गवा येथील यादव कॉलनी, गणेशनगर व नागोबावाडी परिसरातील नागरिकांना दिसल्याने वडगाववासीयांत दहशत पसरली आहे.

रविवारी पहाटे येथील उपनगरातील यादव कॉलनीतील नागरिकांना गव्याचे दर्शन झाले. गव्याने गणेशनगर, मराठा नगरमार्गे नागोबावाडी परिसरातील उसाच्या शेतात आश्रय घेतल्याची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरली. याशिवाय सीसीटीव्हीत कैद झालेल्या गव्याची छायाचित्रे सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाल्याने गव्याला पाहण्यासाठी नागरिकांनी नागोबावाडीकडे धाव घेतली.

गव्याला जेरबंद करण्यासाठी पालिका, पोलिस व वन प्रशासनाने तत्काळ ठोस पावले उचलली. गव्यामुळे जीवितहानी होऊ नये म्हणून वन विभागाच्या पथकाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. प्रशासनाने गव्याचे वास्तव्य असलेल्या परिक्षेत्रात नागरिकांना येण्यास मज्जाव केला होता.

वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, माजी नगराध्यक्षा विद्या पोळ यांनी गव्याचे वास्तव्य असलेल्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन केले.

सकाळी 7 वाजता वन अधिकारी एस. एस. जाधव हे रेस्क्यू टीममधील राकेश शिखरे, तेजस जाधव, प्रतीक रयत, विनायक माळी, सचिन निकम या जवानांसह दाखल झाले. सायंकाळी गव्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. सायंकाळी सातनंतर वन विभागाने गव्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र वन विभागाच्या पथकाला गवा आढळून आला नाही. त्यामुळे पथक माघारी फिरले.

सादळे-मादळेमार्गे पेठवडगावात दाखल?

शनिवारी रात्री भुयेवाडीत मानवी हल्ला करून बिथरलेला गवा सादळे-मादळेमार्गे मंगरायाचीवाडीतून वडगाव शहरात आला असावा, असा अंदाज वन अधिकारी एस. एस. जाधव यांनी व्यक्त केला.

Back to top button