पुढारी ऑनलाईन : पाकिस्तान रेंजर्सनी जम्मूतील (Jammu) आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) अंदाधुंद गोळीबार केल्याने बीएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. दोन जखमी बीएसएफ जवानांना जम्मू येथील रुग्णालयात आणण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
पाकिस्तानी रेंजर्सनी मंगळवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास अर्निया सेक्टरमधील विक्रम चौकीवरील जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर बीएसएफ जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला, असे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे, असे निवेदनात पुढे नमूद केले आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराच्या घटनेची गंभीर दखल घेतली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इक्बाल आणि खन्नोर या पाकिस्तानच्या चौक्क्यांवरून झालेल्या गोळीबारात बीएसएफच्या दोन जवानांना लक्ष्य करण्यात आले. गोळीबार सुरू झाला तेव्हा हे दोघे जवान सीमेजवळील चौकीजवळ विद्युतीकरणाच्या कामात गुंतले होते.
भारत आणि पाकिस्तानने २५ फेब्रुवारी २०२१ रोजी शस्त्रसंधीच्या करारावर स्वाक्षरी केली होती, ज्यामध्ये दोन्ही देशांनी जम्मू आणि काश्मीर आणि इतर क्षेत्रातील नियंत्रण रेषेवर (एलओसी) शस्त्रसंधीच्या सर्व करारांचे काटेकोरपणे पालन करण्याचे मान्य केले होते.
हे ही वाचा :