Trips and employment meet to encourage voters! 
Latest

पिंपरी-चिंचवड : मतदारांना भुलविण्यासाठी सहली अन् रोजगार मेळावे!

backup backup

पिंपरी : राहुल हातोले 

पिंपरी-चिंचवड शहरातील पालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यानुसार इच्छुक नगरसेवकांकडून मतदारराजाची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यासाठी सहली, वस्तूंचे वाटप तसेच रोजगाराच्या संधीसाठी रोजगार मेळावे आदी उपक्रम राबविले जात आहेत. त्यांच्या प्रयोजनातून जनतेशी संपर्क साधत मतांच्या गोळा बेरजेच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर आपापल्या वॉर्डातील मतदारांना माथेरान, महाबळेश्वर, कोकण, कोल्हापूर, तर गोवा, केरळ आणि हैदराबाद अशा राज्याबाहेरील निसर्गरम्य ठिकाणांनादेखील भेटी देण्यासाठी सहली सुरू आहेत.

यामध्ये मुख्यतः महिलावर्गाला विशेष महत्त्व देऊन देवदर्शन घडविण्यासाठी पंढरपूर, कोल्हापूर, शिर्डी, शनिशिंगणाापूर आदी ठिकाणांना सहलींचा ऊत आला आहे.

रोजगाराच्या शोधात राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखोंच्या संख्येने नागरिक शहरात वास्तव्यास आहेत. वॉर्डातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण या भागातील नागरिकांची यादी काढून त्यांच्याशी संपर्क करून घरपोच भेटी दिल्या जात आहेत.

सोबतच त्या-त्या प्रदेशानुसार वेगवेगळा व्हॉट्स अ‍ॅप गु्रप बनवून संबंधित व्यक्तींना एकत्र आणले जात आहे. शेकडो किलोमीटर अंतरावरील एकाच शहरातील नागरिक एकत्र आल्याने आपुलकीची भावना निर्माण होते.याचाच फायदा निवडणुकीतील मतदानात राजकीय कारकीर्द घडविणार्‍या नेत्यांना होत आहे.

वॉर्डातील सर्व घरांचा आणि कुटुंंबातील सर्व सदस्यांचा दूरध्वनी क्रमांक मिळवून प्रत्येकाच्या वाढदिवसाला कॉल आणि मेसेजेसद्वारे शुभेच्छा संदेश पाठविला जातो.

वॉर्डातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करीत त्यांचा ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून या माध्यमातून ज्येष्ठांच्या वाढदिवसाला उपस्थिती दर्शवली जाते.

अशा प्रकारे ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे केले जात आहेत. त्यांच्यासाठी वॉर्डात वाचनालय आणि आसनव्यवस्थेची सोय केली आहे.

बरेच भावी आणि विद्यमान नगरसेवक आपल्या वाढदिवसाला नागरिकांच्या पसंतीचे कलाकार आणून मतदारांचे मनोरंजन घडवून आणत आहेत.

या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणले जात आहे. तसेच महिला मतदारांचे मत मिळविण्यासाठी हळदी-कुंकू, खेळ पैठणीचा आदी उपक्रमातून मतदारांना आकर्षित केले जाते. यानंतर आकर्षक बक्षिसांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला जातो.

कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यांना नोकरी देण्यासाठी वॉर्डात रोजगार मेळाव्याचे आयोजनदेखील केले जात आहे. तसेच लग्नसमारंभ आणि मृताच्या कार्यक्रमाला आवर्जून न चुकता उपस्थिती दर्शविण्याचे कर्तव्य नेत्यांकडून होताना दिसते.

या सर्व उपक्रमातून निवडणूक रिंगणात भरघोस मतांनी विजय मिळावा, हा हेतू असला तरी बरेच इच्छुक समाजसेवेचे व्रत घेऊन रिंगणात उतरतात, तर काही जण प्रलोभनांद्वारे मतदारांचे मतदान मिळविण्याचे काम करीत आहेत.

सहली : निसर्गरम्य आणि देवदर्शनासाठी ठिकाणे माथेरान, महाबळेश्वर, कोल्हापूर, शिडी, शनिशिंगनापूर, भीमाशंकर, कोकण, तसेच राज्याबाहेरील केरळ, हैदराबाद, गोवा व कर्नाटक.

वाढदिवस : खेळ पैठणीचा
नामांकित कलाकारांचे कार्यक्रमवाढदिवस आवर्जून उपस्थिती.

मतदारांचे त्या-त्या जिल्ह्यानुसार वेगवेगळे व्हॉट्स अ‍ॅप गु्रप बनवून मतदारांच्या संपर्कात राहणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT