पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात टोमॅटो दराने सर्वसामान्यांना मेटाकुटीस आणले आहे. मात्र काही शेतकर्यांना या दरवाढीचा चांगला फायदा होताना दिसत आहे. आता आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यातील एका शेतकर्याला टोमॅटो पिकाने कोट्यधीश केले आहे. अवघ्या ४५ दिवसांमध्ये तब्बल तीन कोटी रुपये त्याने कमावले आहेत. ( Tomato farmer )
चित्तूर जिल्ह्यातील चंद्रमौली यांची २२ एकर जमीन आहे. त्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात टोमॅटोची पेरणी केली. उत्पादन जलद मिळण्यासाठी त्यांनी आच्छादन आणि सूक्ष्म सिंचन पद्धती यासारख्या प्रगत तंत्रांचा अवलंब केला. जूनच्या अखेरीस टोमॅटोचे उत्पन्न मिळाल्याने त्यांना त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांनी आपल्या मूळ गावापासून जवळ असणार्या कर्नाटकातील कोलार बाजारात टोमॅटो विकला. त्यावेळी बाजारात १५ किलोच्या टोमॅटोच्या क्रेटची किंमत १,००० ते १,५०० रुपयांच्या दरम्यान होती. त्यांनी गेल्या ४५ दिवसांत ४० हजार पेटी विकल्या आहेत.
'इंडिया टूडे'शी बोलताना चंद्रमौली म्हणाले, "मला आतापर्यंत मिळालेल्या उत्पादनातून मला ४ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. एकंदरीत मला माझ्या २२ एकर जमिनीत एक कोटी रुपये गुंतवावे लागले. यामध्ये उत्पन्न मिळवण्यासाठी कमिशन आणि वाहतूक शुल्काचा समावेश आहे. त्यामुळे टोमॅटोतून मला निव्वळ नफा ३ कोटी रुपये झाला आहे.
भारतातील टोमॅटोची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या आंध्र प्रदेशातील मदनपल्ले येथे टोमॅटोच्या किमतीत वाढ झाली आहे. पहिल्या दर्जाच्या टोमॅटोचा प्रतिकिलो भाव २०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी (२९ जुलै) टोमॅटो खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. दोन आठवड्यांपूर्वी मदनपल्ले येथे टोमॅटो १२० रुपये किलोने विकला जात होता. मात्र, आता इतर राज्यांमध्ये टोमॅटोची मागणी वाढल्याने भावात २०० रुपये किलोपर्यंत वाढ झाली आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किमती ऑगस्टच्या अखेरपर्यंत कायम राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :