Latest

हिंगोली : काँग्रेसच्या हिंगोली पालिका गटनेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

मोनिका क्षीरसागर

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून हिंगोली पालिकेचे गटनेते शेख निहाल यांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय अन्य काही नगरसेवकांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

भारत जोडो यात्रेनंतरही काँग्रेसला लागलेली गळती पक्षासाठी चिंतेचा विषय बनली आहे. जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी थांबण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेसची भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यातून गेल्यानंतरही त्याचा फायदा पक्षाला होत नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. आमदार डॉ. प्रज्ञा सातव व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यात एकमत झाल्याचे वरकरणी दाखविले जात असले तरी अंतर्गत गटबाजी कायम असल्याचे बोलले जात आहे. या गटबाजीला कंटाळून काँग्रेसचे हिंगोली पालिकेचे गटनेते शेख निहाल यांनी मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

याशिवाय हिंगोलीचे भाजपचे माजी नगरसेवक बिरजू यादव, वसमत व कळमनुरी येथील काँग्रेसचे पदाधिकारी अन्वरखाँ पठाण, जयवंतराव पाटील, शेख वाजीद, शेख एजाज, शेख हबीब, इक्बाल पठाण, हाजी अर्शद, शेख फारूख, शेख अफरोज, शेख फेरोज यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

नागपूर येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, पालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमींग सुरू असल्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याचे प्रयत्न जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी चालवले आहे. हिंगोलीसह कळमनुरी, वसमत पालिकेवर राष्टवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याची रणनिती आखली जात असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT