सातारा जिल्हा पोलिस दलातील पहिला श्वान अशी ख्याती असलेल्या 'टिंकू डॉग' चे सोमवारी वृध्दापकाळाने निधन झाले. महाराष्ट्र पोलिस दलात सर्वाधिक सेवा देणारा श्वान अशी रेकॉर्डब्रेक कर्तबगारी त्याच्याच नावावर आहे. त्याने २५ विविध गुन्हे उघडकीस आणले असून, ४ वेळा त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडलचा किताब प्रदान करण्यात आला आहे. दरम्यान, त्याच्या जाण्याने सातारा पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
सातारा जिल्हा पोलिस दलात २००८ साली डॉग स्कॉड स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार श्वान शोधत असताना कोल्हापूर जिल्ह्यातून डॉबरमन जातीचा श्वान खरेदी करण्यात आला. याला सातारा पोलिस दलाने 'टिंकू' असे नाव दिले. नुकतेच जन्मलेले पिल्लू साताऱ्यात आणल्यानंतर त्याला वर्षभर घडलेल्या क्राईमचे डिटेक्शन करण्याबाबतचे ट्रेनिंग देण्यात आले. ट्रेनिंग कालावधी पूर्ण झाल्यानंतर या 'टिंकू'ने पोलिस दलात काम करताना रिझल्ट ओरिएंटेड काम केले. जिल्ह्यात घडणारे खून, दरोडे, जबरी चोरी, क्लिष्ट गुन्हे घडल्यानंतर टिंकूची हमखास हजेरी राहायची.
टिंकूने आतापर्यंत २५ गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मदत केली आहे. महाराष्ट्रातील ही त्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी ठरलेली आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलिस दलाच्या विविध स्पर्धा असतात. यामधील महाराष्ट्र स्टेट पोलिस ड्युटी मीट (एमएसपीडीएम) ही राज्यस्तरीय स्पर्धा असून टिंकूने या स्पर्धेत ४ वेळा गोल्ड मेडल मिळवले आहे.
तसेच पोलिस दलाची 'ऑल इंडिया' स्पर्धा होत असून टिंकू पाचवेळा त्यामध्ये सहभागी झाला होता. दरम्यान, सातारा जिल्हयात डॉग स्कॉडचे अनेक डेमो होत असतात तसेच विविध घटनेनंतर कॉल येत असताना. टिंकूने ५०० हून अधिक डेमो व कॉल अटेंड केले आहेत.
टिंकू गतवर्षी पोलिस दलातून निवृत्त झाला. त्याची १२ वर्षे पोलिस दलात सेवा झाली होती. महाराष्ट्र पोलिस दलात एवढी सेवा अद्याप कोणत्याही श्वानाने बजावलेली नाही. या टिंकूचे राहूल आमणे व गजानन मोरे हे पोलिस हवालदार हॅन्डलर (सांभाळ करणारे) होते. निवृत्तीनंतर आमणे पोलिस हे त्याचा सांभाळ करत होते. सोमवारी त्याच्या जाण्याने डॉग स्कॉडच्यावतीने त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले.