Ajit Pawar vs Income tax : ऐन दिवाळीत अजित पवारांवर संकट, १ हजार कोटींच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश | पुढारी

Ajit Pawar vs Income tax : ऐन दिवाळीत अजित पवारांवर संकट, १ हजार कोटींच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. यातील पाच संपत्तींवर जप्ती आणण्याचा आदेश काढण्यात आला आहे. दरम्यान ईडीने अनिल देशमुख यांची तब्बल १३ तास चौकशी केल्यानंतर रात्री उशीरा अटक करण्यात आली. आता राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नेत्यांवर कारवाई होत असल्याने राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीवर मोठे संकट आल्याचे बोलले जात आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी निगडीत ५ संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत. ही संपत्ती जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. (Ajit Pawar vs Income tax)

Ajit Pawar vs Income tax : किरीट सोमय्यांचे आरोप

आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या व्यवहारांची चौकशी सुरू असून, अजित पवार यांचे आर्थिक व्यवहार आणि उलाढाल आश्चर्यकारक आहे. अजित पवार यांचे मित्र आणि बिल्डरांकडून त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या सदस्यांच्या खात्यात शंभर कोटींहून अधिकची अपारदर्शक नामी व बेनामी आवक झाल्याचे आढळून आल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.

पवार परिवाराचे जावई मोहन पाटील आणि अन्य सदस्यांच्या खात्यातही कोट्यवधी रुपये आले असल्याचे आयकर विभागाला आढळून आले आहे. अजित पवार यांनी नामी व बेनामी संपत्तीसाठी मोहन पाटील यांचाही उपयोग केलेला दिसत आहे, असे सोमय्या म्हणाले.

अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ अजित पवार, आई आशाताई पवार, बहीण विजया मोहन पाटील, मेहुणे मोहन पाटील आणि बहीण नीता पाटील यांची गेले 19 दिवस आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. आता ‘ईडी’चीही चौकशी सुरू आहे.

यातून तब्बल 1 हजार 50 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती समोर आली आहे. त्याचबरोबर 184 कोटी रुपयांची रोकड , दागिने आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती लागली आहेत, असे सोमय्या यांनी सांगितले.

मोहन पाटील हे जरंडेश्वर कारखान्याचे एक मालक असून, जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड साखर कारखाना, अंबालिका शुगर प्रा. लि. व अन्य कंपन्यांचे आर्थिक व्यवहार, तसेच अजित पवार मित्र परिवाराच्या आणि समुहाच्या विभिन्न कंपन्यांमधील हेराफेरी यातून समोर येत आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

आयकर विभागाकडून टाकण्यात आलेल्या कंपन्या

गुरू कमोडिटी सर्व्हिसेस प्रा. लि., स्पार्कलिंग सॉईल प्रा. लि., फायर पॉवर मार्केटिंग (इंडिया) प्रा. लि., नॉन कॉन एनर्जीज् (इंडिया) प्रा. लि., आर्या अ‍ॅग्रो बायो अँड हर्बल्स प्रा. लि., जय अ‍ॅग्रोटेक प्रा. लि., कल्प वृक्षा प्रमोटर्स प्रा. लि., सूर्यकिरण अ‍ॅग्रो इस्टेटस् प्रा. लि., ओंकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स, शिवालिक बिल्डर्स प्रा. लि., ओंकार रिअल्टर्स प्रा. लि., जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि., गुफी ग्राफिक्स प्रा. लि., गोयल गंगा इस्टेट अँड प्रॉपर्टीज् प्रा. लि. अशा डझनभर कंपन्यांचा आर्थिक व्यवहारांतर्गत बेनामी संपत्ती मनी लाँडरिंगसाठी वापर झाला आहे.

Back to top button