पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात शनिवारी (दि.१९) फ्लूमुळे आणखी तीन मृत्यूची नोंद झाली असून, जानेवारीपासून आतापर्यंत अशा एकूण मृत्यूंची संख्या सात झाली आहे. तर कोविड-19 ने शनिवारी ठाण्यात एकाचा बळी घेतला. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी मात्र इन्फ्लूएंझा A चा H1N1 उपप्रकार किंवा H3N2 उपप्रकारामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे की नाही याचा अद्याप अहवाल येणे बाकी आहे, असे म्हटले आहे. फ्लूच्या विषाणुंमुळे मृत्यू झाल्याचा संशय असून अहवालानंतर नेमके कारण समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबरपासून भारतात फ्लूची महामारी दिसून येत आहे, मुख्यत्वे H3N2 विषाणूचा संसर्ग वाढत आहे. गेल्या एका महिन्यात H1N1, एडेनोव्हायरस आणि कोविड विषाणूंमुळे तापाच्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. मुले आणि वृद्ध आतापर्यंत सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
शनिवारी राज्यातील आरोग्य विभागाच्या फ्लू अपडेटनुसार पुणे, वाशीम आणि खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत झालेल्या सात मृत्यूंपैकी तीन मृत्यू H1N1, तर एक H3N2 मुळे झाले आहेत. अहवालात म्हटले आहे की, या वर्षी आतापर्यंत 184 लोकांना H3N2 विषाणूची लागण झाली. तर 405 लोकांना स्वाइन फ्लूची लागण झाली. सध्या राज्यभरातील विविध रुग्णालयांमध्ये फ्लूचे १९६ रुग्ण दाखल आहेत. राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत इन्फ्लूएंझा-ए चे 3 लाखांहून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोविड मृत्यूची नोंद झाली. शनिवारी ठाण्यात एकाचा मृत्यू झाला, तर शुक्रवारी कोल्हापुरात मृत्यूची नोंद झाली होती. कोविड-19 प्रकरणांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. मुंबईत कोविडच्या रूग्णांमध्ये शनिवारी आदल्या दिवसाच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,164 वर पोहोचली असून त्यात मुंबईतील 246 रुग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा :