Putin Arrest Warrant: 123 देशांमध्ये पाऊल ठेवताच पुतिन यांना होणार अटक! | पुढारी

Putin Arrest Warrant: 123 देशांमध्ये पाऊल ठेवताच पुतिन यांना होणार अटक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Putin Arrest Warrant : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धासंदर्भात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. या वॉरंटनुसार जगातील 123 देशांमध्ये पाऊल ठेवताच रशियन राष्ट्राध्यक्षांना अटक केली जाईल. यासोबतच रशियाच्या बालहक्क आयुक्त मारिया अलेक्सेव्हना लवोवा-बेलोवा यांच्याविरुद्धही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. युक्रेनियन मुलांना बेकायदेशीरपणे रशियात नेल्याचा आरोप पुतीन यांच्यावर आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला एक वर्षाहून अधिक काळ लोटला असून हे युद्ध अजूनही सुरू आहे.

या वॉरंटनुसार पुतिन यांनी 123 देशांपैकी कोणत्याही देशात प्रवास केल्यास त्यांना तत्काळ अटक केली जाईल. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे (आयसीसी) वकील करीम खान यांनी ही माहिती दिली. यामुळे जगभर प्रवास करताना पुतिन यांना त्रास होणार हे निश्चित. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाकडे पोलीस नसले तरी ते या प्रकरणातील देशांवर अवलंबून आहे. पण पुतीन याच्यासारख्या हायप्रोफाईल व्यक्तीला अशा प्रकरणात गुंतवून अटक झाली असेल, असे एकही प्रकरण आतापर्यंत समोर आलेले नाही.

पुतीन यांना अटक होईल? (Putin Arrest Warrant)

यापूर्वी, सुदानचे नेते ओमर अल-बशीर यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे सदस्य असलेल्या विविध देशांना भेट दिली. विशेष म्हणजे याच न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केले होते. आतापर्यंत पण त्यांना अटक झालेली नाही. कोलंबिया लॉ स्कूलचे प्रोफेसर मॅथ्यू वॅक्समन म्हणाले की, ‘आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पण पुतीन यांना अटक झालेली पाहण्याची शक्यता कमी आहे.’

काय शक्यता आहेत?

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रशिया हा देश अमेरिका आणि चीनप्रमाणे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा सदस्य नाही. तीच गत युक्रेनही आहे. हा देश देखील आयसीसीचा सदस्य नाही. पण सध्याची युद्धाची परिस्थितीत पाहता युक्रेनने आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करून आयसीसीमध्ये पुतिन यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. मात्र, मॉस्कोने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे हे वॉरंट फेटाळले असून रशियाला आयसीसीच्या अधिकार क्षेत्राला मानत नाही. अशा परिस्थितीत कायदेशीर दृष्टिकोनातून हा निर्णय आमच्यासाठी महत्त्वाचा नसल्याचे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले आहे. (Putin Arrest Warrant)

Back to top button