नाशिक: पुढारी वृत्तसेवा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताच्या फलकावरून अखेर शरद पवार यांचा फोटो गायब झाला आहे. शरद पवार यांच्या फोटो ऐवजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा फोटो फलकांवर लावण्यात आला आहे. यामुळे अजित पवार यांच्या स्वागताचे नाशिकमध्ये उभारण्यात आलेले फलक राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.
संबधित बातम्या :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फाळणी झाली आहे. पक्षावर दोन्ही गटांच्या नेत्यांनी दावा केला आहे. पक्षाचे नाव व चिन्हाच्या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. अद्याप त्यावर कुठलाही फैसला झालेला नाही. सुरूवातीला पक्ष फुटीनंतरही अजित पवार गटाकडून त्यांच्या फलकांवर शरद पवार यांचा फोटो लावण्यात येत होता. त्यामुळे शरद पवार यांनीच अजित पवार गटाला 'माझा फोटो, नाव कुठेही वापरू नका' असे बजावले होते. त्यानंतरही काही ठिकाणी अजित पवार समर्थकांच्या बॅनरवर, कार्यालयांमध्ये शरद पवार यांचा फोटो लावण्यात आल्याचे प्रकार घडल्याने शरद पवार यांनी थेट कारवाईचा इशारा दिला होता. 'माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरण्यात यावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझे आता वैचारीक मतभेद आहेत त्यांनी यापुढे माझ्या परवानगीनेच माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नये, अशी तंबी शरद पवार यांनी दिली होती.
त्यामुळे अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान समर्थकांनी उभारलेल्या फलकांवरून शरद पवार यांचा फोटो गायब झाला आहे. मात्र त्यांच्या जागी आता यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आला आहे. चव्हाण यांनी शरद पवार यांना मानसपुत्र मानले होते. चव्हाण हे देशाचे संरक्षणमंत्री झाल्यावर नाशिकमधून लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले होते. त्याच ठिकाणी अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाण यांचे फोटो फलकावर लावण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा :