गणपती मुर्ती 
Latest

लातूर : आठवणीपुरते उरले बलुतेदारांचे गणपती; गावगाड्यातही होता मान

अनुराधा कोरवी

लातूर; शहाजी पवार : गाव असो की शहर गणेशोत्सवाची चाहूल लागली की गणपतीच्या मूर्तींची दुकाने सर्वत्र दिसतात. या मूर्ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक कारागीर वर्षभर राबत असतात. तथापि सव्वाशे वर्षांपूर्वी अशी परस्थिती नव्हती. तेव्हा गावगाड्यात महत्वाचे स्थान अन मान असलेले बलुतेदारच स्वत:चा व्यवसाय सांभाळत गणेशोत्सावासाठी गणेशाच्या मुर्ती तयार करुन द्यायचे.

साधारणपणे कुंभार, सुतार व सोनार गणेश मूर्ती बनवत असत. त्यासाठी वारुळाची काळी माती किंवा नदीकाठी मिळणाऱ्या शाडूचा वापर केला जाई. हाताने बनवलेल्या या मूर्ती तेवढ्या आखीव रेखीव नसल्या तरी त्यात भाविकतेचा भाग अधिक असल्याने घरांघरात त्याची मनोभावे पूजा केली जाई. कालांतराने या मूर्तीतील ओबडधोबडपणा सुतार आणि कुंभाराला जाणवला आणि सुरेख मूर्तींची कल्पना आकारला आली. या मूर्ती तयार करण्यासाठी त्यांनी लाकडावर गणेशाची मुर्ती चितारुन त्याचे साचे तयार केले अन पुढे हे साचेच या बलुतेदारांची खासीयत बनून गेले.

याबाबत सांगताना आपल्या आजोबांनी अन् वडिलांनी सांगितेली आठवण जागवत लातूर जिल्ह्यातील जान‌वळचे सागर पांचाळ म्हणाले, हाताने बनवलेले गणपती सुबक नसल्याने व ते करण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याने एका लाकडी फळीवर माझे खापर पणजोबा यदुराय पांचाळ यांनी गणपतीचे सुरेख चित्र काढून ते साचाच्या रुपात कोरले अन् यातून आकर्षक मूर्ती तयार होवू लागल्या.

शेकडो वर्षापूर्वींचे असे साचे आज पहावयास मिळत नाहीत. परंतु, सागर पांचाळ यांनी त्यांच्या पुर्वजाचं हे कलावैभव मोठ्या निष्ठेन जपून ठेवलय. त्यांच्याकडे गणपतीचे असे दोन साचे आजही पहावयास मिळतात. साच्यातील गणपती तेव्हा लोकांना खूप आवडले होते. विशेष म्हणजे, मूर्तीकलेच कसलही शिक्षण नसताना गणपती प्रती असलेल्या भक्तीभाव अन गावकऱ्यांप्रती असलेला आदरभाव यातूनच हे कलावेभाव आकारला आल होते. मात्र, आज ते अस्तंगत होण्याच्या मार्गावर असून या कलेच पुनरुज्जीवन करायला हवं

पाच मिनिटांत शाडूचा गणपती तयार

साचातल्या गणपती तयार करण्यासाठी गावकरी नदीकाठची शाडू आणून ती या बलुतेदारांना देत. बलुतदार ती बारीक वाटत असे त्यानंतर तिला चाळण लावून त्यातून मिळालेली वस्त्रगाळ माती भिजत घातली जाई. ती चांगली भिजली की लाकडाच्या साचाच्या आतल्या भागावर तेलाचा हात फिरवून शाडूची माती त्यावर थापली जाई अन् पाच मिनिटांत शाडूचा आखीव रेखीव गणपती तयार होई.

बलुतेदारास देत मानाची सुपारी, गुळाचा खडा

या मूर्तीचा मोबदला म्हणून गावचे कारभारी तसेच गावकरी बलुतेदारास मानाची सुपारी गुळाचा खडा अन् खोबऱ्याचा तुकडा देत. वर्षाकाठी बलुत्याच्या माध्यमातून धान्याच्या रुपात मिळणारा मोबदला (बलुते) बलुतेदारांना पुरेसा असायचा. त्यामुळे कारभाऱ्यांनी दिलेली मानाची पान सुपारी घेण्यात त्यांना मनोमन समाधान वाटायचे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT