तळेगाव स्टेशन : मावळ तालुक्यात वाढतेय ऊसक्षेत्र | पुढारी

तळेगाव स्टेशन : मावळ तालुक्यात वाढतेय ऊसक्षेत्र

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : मावळात भातशेती जरी मोठ्या प्रमाणात होत असली तरी उसाचेही क्षेत्रही दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी शेतकर्‍यांनी 1616 हेक्टरमध्ये ऊस लागवड केली आहे. एकदा ऊस लावला की त्याचे बेणे साधारण 2 वेळा चालते. ऊस लावण्यापूर्वी शेणखताचा खर्च असतो. नंतर वाढ व्हायला लागल्यानंतर रासायनिक खताचा खर्च असतो. ऊस साधारण 4 महिन्यांचा झाल्यानंतर फारशी मेहनत करावी लागत नाही आणि फारसा खर्चही करावा लागत नाही. वरचेवर पाणी दिले की चालते.
उसाची पूर्ण वाढ झाली की साखर कारखान्याच्यावतीने ऊस तोडणी करुन ऊस कारखान्यात नेला जातो.

यामुळे उसाचे पीक शेतकर्‍यांना बर्‍यापैकी परवडत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी उसाचे उत्पन्न घेण्याकडे वळलेले दिसत आहे.
सध्या मावळात ऊस तोडणीस आला आहे. परंतु, पाऊस भरपूर झाल्यामुळे उसात पाणी साचले असून ऊस तोडणीस आणि वाहतूकीस अडथळे येत आहेत. यामुळे ऊस कारखान्यास पाठविणेस वेळ लागत आहे. यामुळे उसास तुरे येवून ऊस पोकळ होवून वजन घटण्याची शक्यता असल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्या उसातील पाणी आटले आहे तेथील उसाची तोड सुरू आहे.

मावळ तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. यावर्षी शेतकर्‍यांनी 1616 हेक्टरमध्ये ऊस लागवड केली आहे. उसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळे लावल्यास कीड नियंत्रणात येऊन उसाचे उत्पन्न वाढेल.
                               – अश्विनी खंडागळे, सहायक कृषी अधिकारी

Back to top button