नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात राष्ट्रवादी हा मराठा समाजाचा पक्ष असल्याचा समज लोकांमध्ये झाला आहे, तो पुसणे आवश्यक वाटल्यानेच प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्यांकडे द्यावे, असे मत मी मांडले. त्यामुळे पक्षमजबुतीलादेखील फायदा होईल, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. हे माझे वैयक्तिक मत आहे, बाकी निर्णय पवार घेतील, त्यांना सर्व समजते असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी केलेल्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये आले असता पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी देशातील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची ताकद विशद केली होती. मग आपल्याकडे शरद पवार असताना आपण काय करतो, असा सवाल अजितदादांनी केला होता. त्यावर पक्षबांधणीमध्ये समाजाचा समतोल राखणे आवश्यक आहे. ओबीसी नेत्यांना संधी मिळाल्यास राज्यातील सर्वच समाज पक्षाच्या पाठीशी उभा राहील, असे आपण सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.
भारतीय जनता पक्षात प्रमोद महाजनांसारखे मजबूत नेते असतानादेखील पक्षाने गोपीनाथ मुंढेंना प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली होती. त्यांनी माळी, धनगर, वंजारी असा माधव फॅक्टर राज्याच्या राजकारणात आणला होता. त्याचा फायदा आजही भारतीय जनता पक्षाला होत आहे. कोणताही राजकीय पक्ष असो, पक्षाची बांधणी करताना समाजाचा समतोल साधत असतो, राष्ट्रवादी पक्षात तसे होताना दिसत नाहीये. राष्ट्रीय अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते पद सर्व महत्त्वाची पदे ही मराठा समाजाकडे असल्याने जनतेचा पक्षाबद्दल एक समज दृढ झाला आहे. बावनकुळे, पटोले, राऊत, गायकवाड अशी प्रदेशाध्यक्षांची नावेही त्यांनी यावेळी घेतली.
शरद पवार यांनी काँग्रेस सोडली तेव्हा राष्ट्रवादी स्थापन केली. लगोलग निवडणुका लागल्याने आम्ही महाराष्ट्र पिंजून काढला आणि काँग्रेससोबत सत्तेत आल्यावर उपमुख्यमंत्रिपद मी भूषविले. लगेचच शरद पवार यांनी बबनराव पाचपुतेंना प्रदेशाध्यक्ष करून समतोल साधला होता. गेल्या ३० ३२ वर्षांपासून मी शरद पवारांसोबत आहे. ते सांगतील तसेच आम्ही करू, यात शंका नाही, असेही भुजबळ म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी पक्षातील ओबीसी नेत्यांची नावे विचारली असता ओबीसी नेत्यांमध्ये जुना चेहरा पाहिजे तर मी आहे, मध्यम पाहिजे तर सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड आणि नव्या दमाचा पाहिजे तर धनंजय मुंढे आहे. अशी नावे यावेळी भुजबळांनी सुचविली.
हेही वाचा :