ऑगस्टमध्ये इथेनॉलवर धावणाऱ्या गाड्या येतील : नितीन गडकरी | पुढारी

ऑगस्टमध्ये इथेनॉलवर धावणाऱ्या गाड्या येतील : नितीन गडकरी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  इथेनाॅलमुळे अन्नदाता असणारा शेतकरी हा ऊर्जादाता बनला आहे. इथोनाॅलसारख्या जैवइंधनामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्माण होत आहे. भविष्यात या इंधनातून दोन लाख कोटींचा उद्योग निर्माण होईल. येत्या ऑगस्ट महिन्यात इथेनॉलवर धावणाऱ्या दुचाकी, चारचाकी गाड्या बाजारात आणणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईत केली.

मुंबईत वरळीतील हॉटेल्स फोर सीजन्स येथे ”मोदींची ९ वर्षे” यानिमित्ताने भाजपने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, येत्या ऑगस्टमध्ये टोयोटा कंपनी १०० टक्के इथेनॉलवर चालणारी गाडी बाजारात आणत आहे. दुचाकी, चारचाकीनंतर आता ट्रॅक्टर, ट्रक अशी सर्व वाहने इथेनॉलवर धावणाऱ्या असतील. पेट्रोलच्या तुलनेत अवघ्या १५ रुपयांत प्रतिलिटर हे बायोइंधन उपलब्ध होईल. यामुळे देश कार्बन न्यूट्रलकडे वाटचाल करत असल्याचे गडकरी म्हणाले. इथेनाॅलमुळे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळाले. आधी केवळ साखर होती, तेंव्हा ब्राझीलमध्ये २२ रूपये तर भारतात ३२ रूपये किलो साखर होती त्यामुळे निर्यातच शक्य नव्हती. इथेनाॅलमुळे तेंव्हा शेतकऱ्यांना पैसा मिळाल्याचे गडकरी म्हणाले.

पेट्रोल-डिझेलसारख्या खनिज इंधनांच्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होते. मुंबईतील बेस्टच्या सर्व बसेस इलेक्ट्रिकवर चालल्या तर प्रदूषण प्रचंड कमी होईल, असेही गडकरी म्हणाले. सध्या बेस्टची बसगाडी १ किलोमीटर चालवायला ११५ रूपये खर्च येतो. हीच बस इलेक्ट्रीकवर आणल्यास साधी बस ३९ तर एसी बसला प्रतिकिलोमीटर ४१ रूपयेच लागतील. तब्बल ३० टक्के स्वस्तात बेस्ट बससेवा चालविता येईल, असेही गडकरी म्हणाले.

Back to top button