बिडकीन; चंद्रकांत अंबिलवादे : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील वृद्धेच्या खुनाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या पथकासह बिडकीन पोलिसांना यश आले. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या आरोपीच्या मोटारसायकलवरील 'मॉम डॅड' नावावरून पोलिसांनी खूनाचा छडा लावला. दोन दिवसांत पोलिसांनी संशियाताच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पैठण तालुक्यातील बिडकीन येथील हालिमा वजीर शेख ( वय ६५ ) यांचा २ जून रोजी सकाळी अज्ञात व्यक्तीने खून केला होता. अंगावरील सर्व दागिने लुटून आरोपी फरार झाला होता. या घटनेने बिडकीन पोलिसांसमोर आरोपीला शोधण्याचे आव्हान होते. ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीचा छडा लावण्यासाठी डीवायएसपी डॉ विशाल नेहुल, सपोनि संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक मोरे यांना सूचना दिल्या. गुन्हे शाखेच्या पथकासह बिडकीन पोलिसांचा घटनास्थळी काही पुरावा मिळतो का, याबाबत तपास सुरू होता. परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये आरोपी मोटरसायकवरून जात असल्याचे कैद झाले होते; पण आरोपीने तोंडाला बांधले असल्याने ओळखता येत नव्हते. मोटरसायकलवर अस्पष्ट 'मॉम डॅड' असे इंग्लिशमध्ये लिहलेले नाव डीवायएसपी डॉ. विशाल नेहुल यांच्या निदर्शनास आले.
तपासादरम्यान शुक्रवारी रात्री डीवायएसपी डॉ. विशाल नेहुल पोना सचिन भुमे, गणपत भवर, परवेश पठाण, सुनील काकडे बिडकीन पोलिस ठाण्याचे गायकवाड यांच्या पथकासोबत तपास कामी पेट्रोलिंग करीत हाेते. यावेळी 'मॉम डॅड' इंग्लिश नाव असलेली मोटरसायकल शेकटा ( ता.पैठण) या परिसरातील एका हॉटेलसमोर उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ मोटरसायकलवर असलेलं नावं व सीसीटीव्ही मधील नाव पडताळणी करून पाहिले. संशयावरून परिसरात सापळा लावून मोटर सायकलस्वार राजू इसाक शेख ( रा. करंजखेडा ता. गंगापूर ) याला ताब्यात घेतले.
राजू शेख याची कसून चौकशी केली. खून झालेल्या हालिमा वजीर शेख या त्याची आत्या असल्याची माहिती समोर आली. पैशाच्या लालसे पोटी खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल, सपोनि संतोष माने घटनेचा उलगडा झालेली माहिती सविस्तर सायंकाळी देणार असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?