पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत सरकारने मणिपूरच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मणिपूरमध्ये (Manipur Violence) शांतता समितीची स्थापना केली आहे. समितीच्या सदस्यांमध्ये मुख्यमंत्री, राज्य सरकारचे काही मंत्री, खासदार, आमदार आणि विविध राजकीय पक्षांचे नेते यांचा समावेश आहे. या समितीमध्ये माजी नागरी सेवेतील अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध जातीय गटांचे प्रतिनिधी यांचाही समावेश आहे.
दरम्यान, जातीय हिंसाचाराने प्रभावित मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील एका गावात शुक्रवारी ( दि. 9 ) आणखी एक घटना समोर आली आहे. जिथे सुरक्षा कर्मचार्यांच्या वेशात आलेल्या अतिरेक्यांनी शोध मोहिमेच्या बहाण्याने काही लोकांना घराबाहेर बोलावले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात 3 जण ठार झाले आणि 2 जण जखमी झाले.
कांगपोकी आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांच्या सीमेवरील खोकेन गावात ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे अतिरेकी मेईतेई समुदायातील असल्याचे समजते. ते म्हणाले की, गावात नियमित गस्तीवर असलेले सुरक्षा दल गोळ्यांचा आवाज ऐकून तेथे पोहोचले, पण तोपर्यंत अतिरेकी पळून गेले होते.
तिघांचेही मृतदेह आसाम रायफल्सने ताब्यात घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मणिपूर पोलिस, आसाम रायफल्स आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. मणिपूरमध्ये 3 मेरोजी अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याच्या मेईतेई समुदायाच्या मागणीविरोधात 'आदिवासी एकता मोर्चा' काढल्यानंतर 2 समुदायांमध्ये हिंसाचार झाला.
हेही वाचा